चार अधिकाऱ्यांना लोकायुक्त दणका
बेळगाव, धारवाडसह राज्यभरात छापे : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी लोकायुक्त विभागाने मंगळवारी पहाटे चार सरकारी अधिकाऱ्यांना दणका दिला. बेळगावसह धारवाड, विजापूर, विजयनगर, शिमोगा, मंड्या या जिल्ह्यात अधिकाऱ्यांची निवासस्थाने, कार्यालयांवर आणि व्यापारी संकुलांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईन कोट्यावधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता उघडकीस आल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहाहून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. विजापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एल. आर. शंकर नायक कार्यरत असलेल्या इस्पितळातील कार्यालय, विजयनगर जिल्ह्याच्या होस्पेटमधील त्यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. त्यांच्याजवळ बेहिशेबी स्थावर आणि जंगम मालमत्ता आढळून आल्याचे समजते. विजयनगर लोकायुक्त डीवायएसपी सचिन यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक अमरेश, राजेश लमाणी आणि कोप्पळ आणि बळ्ळारीतील लोकायुक्त अधिकाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.
बेळगावमधील कृषी खात्याचे सहसंचालक राजशेखर बिजापूर यांच्याही निवासस्थानांवर छापे टाकून झडती घेण्यात आली. लोकायुक्त पोलिसांनी बेळगाव, धारवाड, चित्रदुर्ग, हावेरी जिल्ह्यांतील निवासस्थाने आणि कार्यालयांसह एकाच वेळी छापे टाकले. राजशेखर यांनी हावेरी जिल्ह्याच्या शिग्गाव तालुक्यातील वॉटर स्पोर्ट्स योजनेत गुंतवणूक केली आहे. बेंगळूरमध्येही एक फ्लॅट व धारवाडच्या सन्मती कॉलनीत अपार्टमेंटमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याची माहिती लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याचे समजते. यापूर्वी धारवाड कृषी उपसंचालक म्हणून सेवा बजावत असताना बेहिशेबी मालमत्ता संपादन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
मंड्या येथील मंड्या तालुका पंचायतीचे प्रशासक भैरेश यांचे निवासस्थान तसेच मद्दूर येथील त्यांच्या सासऱ्यांचे निवासस्थान आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कारवाईवेळी रोख रक्कम, अनेक शेतजमिनीची कागदपत्रे आणि भूखंडांसह अनेक वारसाहक्कांची कागदपत्रे सापडली असून त्यांची पडताळणी सुरू आहे.
शिमोगा येथील ग्रामीण पाणीपुरवठा आणि सांडपाणी खात्याच्या कार्यकारी अभियंता रुपिला नायक यांच्या निवासस्थानावरही छापे टाकण्यात आले. यावेळी भूखंड, वणिज्य संकुल आणि शेतजमिनीच्या नोंदींची कागदपत्रे आढळून आली. शिमोग्याच्या बसवनगुडी येथील निवासस्थान आणि बेंगळूरमधील त्यांच्या नातेवाईकांच्या घरावरही छापे टाकण्यात आले. शिमोगा जिल्हा लोकायुक्त अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
छापा पडताच नोटांची बंडले कमोडमध्ये टाकली
लोकायुक्त अधिकाऱ्यांचा छापा पडताच राजशेखर यांनी घराच्या स्वच्छतागृहातील कमोडमध्ये नोटांची बंडले टाकल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्या धारवाडमधील सिल्वर ऑर्चिड कॉलनीतील निवासस्थानी पहाटे लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकताच त्यांनी तातडीने दरवाजा उघडला नाही. अधिक चौकशीनंतर त्यांनी कमोडमध्ये 50 हजार रुपये रकमेच्या नोटा कमोडमध्ये टाकून फ्लश दाबल्याचे सांगितले. प्रत्यक्षात किती रक्कम त्यांनी टॉयलेट कमोडमध्ये टाकले, हे समजू शकले नाही.