चार भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्तांचा दणका
धारवाडसह चार ठिकाणी छापा : कोट्यावधींची मालमत्ता उघडकीस, महत्त्वाच्या कागदपत्रांची झडती
बेंगळूर : धारवाड, बेंगळूर, शिमोगा आणि दावणगेरे येथे एकाचवेळी छापे टाकणाऱ्या लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चार भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. छाप्यावेळी कोट्यावधी ऊपयांची बेकायदेशीर मालमत्ता आढळून आली आहे. बेंगळूर ग्रामीणचे कर्नाटक निवासी शैक्षणिक संस्था सोसायटीचे अधीक्षक अभियंता एच. एम. जनार्दन, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता पुऊषोत्तम दास हेगडे, दावणगेरेच्या बेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता अर्जुन आर. एच. आणि धारवाडच्या भूमी अभिलेख सर्वेक्षण सोमालिंगप्पा अशी लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता पुऊषोत्तम दास यांच्या कार्यालयासह 11 ठिकाणी छापे टाकले आहेत. एच. एम. जनार्दन यांच्या कार्यालयावर सकाळपासून छापे टाकण्यात आले असून त्यांच्याजवळ बेकायदेशीर मालमत्ता आढळून आल्या आहेत. म्हैसूरमध्ये 5 ठिकाणी आणि बेंगळूरमध्ये 6 ठिकाणी छापे टाकून महत्त्वाच्या कागदपत्रांची झडती घेण्यात आली. लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने बेस्कॉम अभियंता आर. एच. अर्जुन यांच्या घरावर आणि कार्यालयावरही छापे टाकले. दावणगेरे येथील बेस्कॉमच्या नागरी विभागात कार्यरत असलेल्या अर्जुन यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा आरोप होता.
या पार्श्वभूमीवर लोकायुक्त एसपी एम. एस. कौलापुरे यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने छापा टाकला. अर्जुन यांनी राहत असलेल्या दावणगेरे शहरातील निट्टूवल्ली येथील कार्यालय आणि शिमोगा येथील त्यांच्या घरावर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. शिमोगा येथील घरात मालमत्तेची कागदपत्रे आणि सोने-चांदीचे दागिने सापडले आहेत. आणखी महत्त्वाच्या कागदपत्रांचा शोध अधिकारी घेत आहेत.
शिमोगा येथील विजयनगर आणि गोपालगौडा लेआउटमधील त्याच्या निवासस्थानांवर अधिकाऱ्यांच्या पथकाने छापे टाकले. सागर आनंदपूरजवळील तळले गावात अर्जुन यांच्या मालकीच्या 2.5 एकर आणि 4.5 एकरच्या मोठ्या फार्महाऊसवरही अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. लोकायुक्त डीवायएसपी चंद्रशेखर, निरीक्षक प्रभू सोरेन आणि गुऊराज मैलारी यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात येत असून महत्त्वाची कागदपत्रे तपासली जात आहेत. सर्वेक्षण अधिकारी म्हणून काम करणारे सोमलिंगप्पा सिद्धनगौडर यांच्या निवासस्थानांवरही छापे टाकण्यात आले आहेत. लोकायुक्त पोलीस धारवाडमधील मुरगोड निवासस्थान, भारती नगर निवासस्थान आणि एडीएलआर कार्यालयात तपासणी करत आहेत. लोकायुक्त एसपी सिद्धलिंगप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात येत असून मालमत्तेच्या तपशीलांची माहिती गोळा केली जात आहे.
जाळ्यात अडकलेले अधिकारी
- एच. एम. जनार्दन, अधीक्षक अभियंता, बेंगळूर ग्रामीण
- पुऊषोत्तम दास हेगडे, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते, बेंगळूर
- अर्जुन आर. एच., एईई बेस्कॉम दावणगेरे
- सोमलिंगप्पा, भूमी अभिलेख सर्वेक्षण, धारवाड