For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठ अधिकाऱ्यांना लोकायुक्त दणका

06:40 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
आठ अधिकाऱ्यांना लोकायुक्त दणका
Advertisement

बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी विविध बळ्ळारी, चित्रदुर्ग, शिमोग्यासह जिल्ह्यांत छापे

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

लोकायुक्त विभागाने भ्रष्ट अधिकाऱ्यांना पुन्हा दणका दिला आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता संपादन प्रकरणी मंगळवारी सकाळी बेळगाव, बळ्ळारी, चित्रदुर्ग, म्हैसूर, कोडगू, शिमोग्यासह विविध जिल्ह्यांत छापे टाकण्यात आले. 8 अधिकाऱ्यांशी संबंधित कार्यालये, निवासस्थाने व इतर मालमत्तांची झडती घेण्यात आली. यावेळी लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाला मोठ्या प्रमाणावर घबाड आढळून आले.

Advertisement

लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी भल्या पहाटे चित्रदुर्गमधील निर्मिती केंद्राच्या माजी अकाऊंटंट सुशीलम्मा यांच्या निवासस्थानावर धाड टाकली. वर्षभरापूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. अकाऊंटंट असताना त्यांनी भ्रष्टाचार करून बेहिशेबी माया जमविल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चित्रदुर्गमधील मेदेहळ्ळी कॉलनीतील निवासस्थान, हिरियुर तालुक्यातील यादलघट्ट गावातील फार्महाऊसवर छापा टाकून तपासणी केली. लोकायुक्त अधीक्षक वासूदेवराम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

मत्स्योद्योग खात्याच्या अधिकाऱ्यावरही धाड

बळ्ळारीतील मत्स्योद्योग खात्यातील साहाय्यक संचालक शिवण्णा यांचे बळ्ळारीतील कार्यालय, सिद्धार्थनगर येथील निवासस्थानासह एकूण चार ठिकाणी छापे टाकण्यात आले. शिवण्णा यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या होत्या. बेहिशेबी मालमत्ता संपादनाचा आरोप झाल्याने त्यांना लोकायुक्त विभागाने लक्ष्य केले. त्यांच्या सरकारी बोलेरो जीपची देखील तपासणी करण्यात आली. त्यात आढळलेली कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत.

उत्पन्नापेक्षा अधिक माया जमविल्याच्या आरोपावरून सार्वजनिक बांधकाम खात्यातील साहाय्यक कार्यकारी अभियंता रेवण्णा यांचे म्हैसूरमधील निवासस्थान आणि मंड्या शहरातील दोन निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले. लोकायुक्त अधीक्षक टी. जे. उमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

शिमोग्यात दोन अधिकारी लक्ष्य

शिमोग्यात मागासवर्ग कल्याण खात्याचे जिल्हा अधिकारी शोभा के. आर. यांचे शिमोगा, शिकारीपूर आणि सागर येथील निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले. शिकारीपूर येथील चन्नकेशवनगरमधील निवासस्थान, केईबी सर्कलमधील बीसीएम जिल्हा कार्यालय तसेच शिकारीपूर तालुक्यातील तरलघट्टनजीकच्या 4 एकरावरील फार्महाऊसचही झडती घेण्यात आली. सायंकाळपर्यंत त्यांच्याजवळील मालमत्तेची तडताळणी सुरू होती. शोभा यांच्या सागर तालुक्यातील अचापूर येथील शाळेवरही धाड टाकण्यात आली.

मागासवर्ग कल्याण खात्याचे अधिकारी राघवेंद्र यांचे शिमोग्यातील चालुक्य कॉलनीतील निवासस्थान आणि बालराज अर्स रोडवरील देवराज अर्स भवनमधील कार्यालयात झडती घेण्यात आली. लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने त्यांच्याजवळील काही कागदपत्रे ताब्यात घेतली असून पडताळणी केली जात आहे. शिमोग्याचे लोकायुक्त डीवायएसपी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

बेळगावमध्ये नगरविकास कक्षाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता अजयसिंग रजपूत कोडगू जिल्ह्यातील हारंगी जलाशय उपविभागातील साहाय्यक कार्यकारी अभियंता आय. के. पुट्टस्वामी यांच्या मालमत्तांवरही लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकून तपासणी केली.

Advertisement
Tags :

.