For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहा अधिकाऱ्यांना लोकायुक्तांचा दणका

06:23 AM Jul 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
दहा अधिकाऱ्यांना लोकायुक्तांचा दणका
Advertisement

राज्यात 30 हून अधिक ठिकाणी छापे : कलबुर्गी, बेंगळूरसह 7 जिल्ह्यांत झडती

Advertisement

भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता संपादन केल्याच्या आरोपाखाली लोकायुक्त विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांतील 10 सरकारी अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. बुधवारी सकाळी एकाचवेळी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर छापे टाकण्यात आले असून त्यांच्या मालमत्तेचा तपशील गोळा केला जात आहे. बेंगळूर शहर, बेंगळूर दक्षिण, रायचूर, चित्रदुर्ग, तुमकूर, शिमोगा आणि कलबुर्गी या सात जिल्ह्यांतील 30 हून अधिक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या.

Advertisement

लोकायुक्त विभागाने रायचूरमधील कृष्णा भाग्य जल निगम लि. कार्यकारी अभियंता बसनगौडा पाटील, चित्रदुर्गमध्ये कृषी विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता एम. शंकर,  चित्रदुर्ग पाणलोट विकास खात्यातील विभागीय वन अधिकारी बी. एच. दुग्गाप्पा, बेंगळूरमधील सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता नरेंद्र कुमार, केआरआयडीएल बेंगळूर विभागीय कार्यालयातील अधीक्षक अभियंता प्रवीण बी. श्रीहरी आणि बेंगळूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसंचालिका डी. आर. पुष्पा यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले.

तुमकूरमधील लघु पाटबंधारे खात्याचे साहाय्यक अभियंता एन. मधुसूदन, बेंगळूर दक्षिण जिल्ह्यातील कुंबळगोडू पंचायतीचे पीडीओ तिम्मेगौडा, शिमोगा संशोधन विभागाचे साहाय्यक वनसंरक्षक किरण अंगडी आणि कलबुर्गीतील जेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता (विद्युत) अमृतराव यलाल यांच्या निवासस्थानांवरही लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकांनी धाडी टाकल्या.

रायचूरमध्ये कृष्णा जलभाग्य निगम नारायणपूर डावा कालव्याचे कार्यकारी अभियंता बसनगौडा पाटील यांचे एचआरबी लेआऊट येथील निवासस्थान, चिक्कहोन्नकुणी येथील कार्यालय, त्यांच्या भावाचे निवासस्थान आणि त्यांच्या पत्नीच्या नावे असणारे पेट्रोलपंप, यक्लासपूर येथील फार्महाऊस व गोदामांवर छापे टाकून झडती घेण्यात आली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची कागदपत्रे, रोकड, सोन्याची दागिने व इतर मालमत्ता आढळून आली.

कलबुर्गी येथील जेस्कॉमचे कार्यकारी अभियंता अमृतराव यलाल यांचे निवासस्थान, कार्यालयासह 7 ठिकाणी छापे टाकण्यात आले. कलबुर्गी शहरातील जागृती कॉलनीतील निवासस्थान, बसव अपार्टमेंटमधील फ्लॅट, कोत्तंबरी लेआऊटमधील कार्यालय, चिंचोळी तालुक्यातील सुलेपेठ गावातील घरांसह इतर ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी तपासणी केली. अमृतराव यांच्याजवळ 20 एकरहून अधिक कृषी जमीन, जागृती कॉलनीतील फ्लॅटमध्ये स्टुडिओ व इतर व्यवहारांमध्ये ते गुंतल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या निवासस्थानी आढळून आलेली रोकड, सोन्याची दागिने व स्थावर मालमत्ता पाहून लोकायुक्त अधिकारी अचंबित झाले.

बेंगळूरमध्ये बेंगळूर दक्षिण जिल्हा पोलीस प्रमुख स्नेहा यांच्या नेतृत्वाखाली चार अधिकाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. कुंबलगोड पंचायतीचे पीडीओ तिम्मेगौडा उर्फ तिम्मय्या यांचे फार्महाऊस, त्यांचा भाऊ व बहिणीच्या निवासस्थानांवरही धाडी टाकण्यात आल्या. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्रकुमार यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर स्थावर व जंगम मालमत्ता आढळली असून लोकायुक्त अधिकारी त्याचा तपशील गोळा करत आहेत.

बेंगळूरमधील केआरआयडीएलचे अधीक्षक अभियंता बी. श्रीहरी यांच्या निवासस्थानी विदेशी चलन, मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने, शेतजमीन व इतर मालमत्ता आढळली आहे. त्यांच्या नावे व्यावसायिक संकुले व औद्योगिक वसाहतीमध्ये मालकीची जमीन असल्याचे उघड झाले आहे.

Advertisement
Tags :

.