राज्यात आठ भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्त दणका
बेळगावसह आठ जिल्ह्यात कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील 8 भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्त पोलिसांनी बुधवारी दणका दिला. बेळगावसह बेंगळूर, चिक्कमंगळूर, बिदर, तुमकूर, गदग, बळ्ळारी आणि रायचूर या जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले आहे. बेहिशेबी मालमत्ता संपादनासंबंधी तक्रारी आल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांना धाडी टाकण्यात आल्या आहेत.
बळ्ळारीतील परिवहन खात्याच्या सहसंचालक शोभा, चिक्कमंगळूर जिल्ह्याच्या कडूर येथील वैद्यकीय अधिकारी एस. एन. उमेश, बिदर जिल्ह्यातील लघुपाटबंधारे खात्याचे अभियंता रविंद्र, बेळगाव जिल्ह्यातील खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, तुमकूरचे निवृत्त आरटीओ एस. राजू, गदग जिल्ह्यातील बेटगेरी नगरपालिकेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता हुच्चेश, बळ्ळारीतील मागासवर्ग कल्याण अधिकारी आर. एच. लोकेश, रायचूर मधील कनिष्ठ अभियंता हुलीराज गिल्लेसुगुर आणि बळ्ळारी तालुक्यातील बीसीएम अधिकारी लोकेश यांच्या कार्यालयांसह निवासस्थानांवर बुधवारी सकाळी लोकायुक्त पोलिसांनी एकाचवेळी छापे टाकले.
उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता संपादन केल्याच्या आरोपावरून बळ्ळारी तालुक्यातील मागासवर्ग खात्याचे अधिकारी आर. एच. लोकेश यांच्या रामांजनेयनगर येथील निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. त्यांच्याजवळ कुरूगोडू येथे चार एकर जागेवर बागायत असल्याची माहिती लोकायुक्त पोलिसांना मिळाली आहे. आपल्या प्रभावाचा वापर करून खात्यातंर्गत बदल्यांमध्ये हस्तक्षेप करीत असल्याचे आरोपही लोकेश यांच्यावर आहे.
गदग-बेटगेरी नगरपालिकेचे कार्यकारी अभियंता हुच्चेश बंडीव•र यांच्या गदग गजेंद्रगड बागलकोटसह पाच ठिकाणी निवासस्थाने व कार्यालयांवर लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला. कारवाईवेळी त्यांच्याजवळील बेहिशेबी मालमत्तासंबंधीची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहे.
तुमकूर आरटीओमध्ये सेवा बजावून निवृत्त झालेले एस. राजू यांच्यावरही लोकायुक्त पोलिसांनी छापे टाकले. लोकायुक्त एस. पी. हणुमंतरायप्पा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांकडून बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यांच्याजवळ सोने-चांदीचे दागिने, ऐशोआरामी वस्तू, महागड्या कार व स्थावर मालमत्ता आढळून आली आहे.