सरकारी कर्मचाऱ्यांवर लोकायुक्तांचे छापे
प्रभारी उपनोंदणी अधिकारी-पशुवैद्यकीय निरीक्षकाचा समावेश : अनगोळ, हारुगेरी, बेल्लद बागेवाडीत छाप्यांचे सत्र
बेळगाव : बेळगाव येथील प्रभारी उपनोंदणी अधिकारी सचिन बसवंत मंडेद ऊर्फ मंडेदार व निलजी, ता. रायबाग येथील पशुवैद्यकीय निरीक्षक संजय आण्णाप्पा दुर्गन्नावर यांच्या निवासस्थानावर शुक्रवारी पहाटे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले. त्या छाप्यात मोठे घबाड उघडकीस आले असून रात्री उशिरापर्यंत दागिने व इतर मालमत्तांची मोजदाद सुरू होती. लोकायुक्तांच्या या कारवाईने भ्रष्टाचारात बुडालेल्या सरकारी अधिकाऱ्यांना धडकी भरली आहे.
लोकायुक्त पोलीसप्रमुख हणमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरंजन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सचिन मंडेदार यांचे अनगोळ येथील घर, कोर्ट कंपाऊंडमधील कार्यालय, बेल्लद बागेवाडी येथील नातेवाईकांचे घर, अनगोळ येथील एक सोसायटी व एका बँकेत तपासणी केली. दोन लॉकर अधिकाऱ्यांनी उघडले असून या लॉकरमध्ये सुमारे दीड किलो सोन्याचे दागिने आढळून आले आहेत. या पथकात रवी मावरकर, राजू पाटील, बसवराज हुद्दार, अभिजित जमखंडी, राजश्री भोसले आदींचा समावेश आहे. सचिन मंडेदार हे प्रभारी उपनोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासंबंधी एकूण पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. बँक लॉकरमध्ये 1 किलो 430 ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत 81 लाख, 98 हजार 243 रु.) व 5 किलो 571 ग्रॅम चांदीचे दागिने (किंमत 5 लाख 29 हजार 316 रु.) आढळून आले आहेत.
सुमारे 50 लाख रुपयांचे बांधकाम सुरू असलेले घर, 1 एकर 12 गुंठे शेतजमीन, 1 लाख 35 हजार रुपये रोकड, अडीच लाखांची वाहने, 68 लाख रुपयांचे बँक डिपॉझिट, 18 लाख रुपयांची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक, 15 लाख रुपयांची शेअर्समधील गुंतवणूक अशी एकूण 2 कोटी 19 लाख 179 रुपयांची मालमत्ता तपासात उघडकीस आली असून त्यांनी 260.71 टक्के जादा मिळकत मिळविल्याचे उघडकीस आले आहे. दुसरी कारवाई निलजी, ता. रायबाग येथील पशुवैद्यकीय विभागाचे निरीक्षक संजय आण्णाप्पा दुर्गन्नावर यांच्यावर करण्यात आली आहे. लोकायुक्त विभागाचे पोलीस उपअधीक्षक बी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक संगमेश होसमनी, पोलीस निरीक्षक अन्नपूर्णा हुलगूर आदींच्या नेतृत्वाखालील पथकाने निलजी येथील कार्यालय, हारुगेरी येथील घर व हारुगेरी येथीलच एका नातेवाईकाच्या घरावर अशा तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
या कारवाईत 1 कोटी 40 लाख 82 हजार 514 रुपयांची माया त्यांनी जमवल्याचे उघडकीस आले असून एकूण कमाईपेक्षा 112.66 टक्के जादा मिळकत त्यांनी गोळा केल्याचे उघड झाले आहे. 4 लाख 77 हजार रुपये किमतीचे 4 भूखंड, सुमारे 42 लाख रुपये किमतीचे घर, शेतजमीन, 23 लाख 30 हजार 514 रुपये किमतीची जंगम मालमत्ता, 2 हजार 190 रुपये रोकड, 9 लाख 92 हजार 324 रुपये किमतीचे दागिने, साडेचार लाख रुपये किमतीची वाहने व 8 लाख 86 हजार रुपये किमतीचे इतर साहित्य, 50 लाख 77 हजार रुपये किमतीची स्थावर मालमत्ता उघडकीस आली आहे. लोकायुक्त पोलीसप्रमुख हनुमंतराय यांनी एका पत्रकाद्वारे कारवाईची माहिती दिली आहे. दोन अधिकाऱ्यांवरील छाप्यांसाठी शेजारच्या जिल्ह्यातील लोकायुक्त अधिकाऱ्यांनाही बोलावून घेण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे एकाचवेळी आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. अनगोळ, हारुगेरी व बेल्लद बागेवाडी परिसरात रात्री उशिरापर्यंत लोकायुक्त विभागाची तपासणी सुरू होती.