चार अधिकाऱ्यांना लोकायुक्त दणका
बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी 15 ठिकाणी छापे : मोठ्या प्रमाणावर आढळले घबाड
बेंगळूर : बेंगळूर, मंगळूर, मंड्यासह राज्यातील 15 ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी गुरुवारी छापे टाकले. बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अबकारी खात्याचे अधीक्षक मोहन यांच्यासह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. चारही अधिकाऱ्यांजवळ मोठ्या प्रमाणावर घबाड आढळले आहे. अबकारी खात्याचे मोहन के., योजना खात्याचे संचालक एन. के. तिप्पेस्वामी, कावेरी पाणीपुरवठा निगमचे व्यवस्थापकीय संचालक महेश, भूविज्ञान खात्याचे वरिष्ठ तज्ञ एम. कृष्णवेणी यांच्या मालमत्तांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले. त्यांच्याजवळ ऐशोआरामी वस्तू, दागिने व कोट्यावधींची स्थावर मालमत्ता आढळली असून यासंबंधीच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
तिप्पेस्वामी यांच्या निवासस्थानी किलोभर सोने
योजना खात्याचे संचालक एन. के. तिप्पेस्वामी यांच्या बेंगळूरमधील गिरीनगर येथील निवासस्थानी लोकायुक्त छाप्यात मोठ्या प्रमाणावर सोने-चांदीचे दागिने, वस्तू आढळले आहे. 28 पेक्षा अधिक कर्णफुले, 8 हून अधिक महागडी घड्याळे, 23 पेक्षा अधिक सोन्याचे हार, मोत्यांचे पेंडेट असणारा हार, मोठ्या प्रमाणावर चांदीची दागिने व वस्तू, आढळले आहेत. सोनारांना बोलावून त्यांची मोजदाद केली जात आहे. याशिवार 7 लाखांची रोकड, मालमत्तेची कागदपत्रे आढळली असून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी त्याची पडताळणी केली.
छापा पडलेले अधिकारी
- मोहन के. - अबकारी अधीक्षक
- एन. के. तिप्पेस्वामी - योजना खात्याचे संचालक
- महेश - कावेरी पाणीपुरवठा निगमचे एमडी
- एम. सी. कृष्णवेणी- खाण, भूविज्ञान खाते वरिष्ठ तज्ञ