For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निपाणी तहसीलदारांवर लोकायुक्त छापा

08:04 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
निपाणी तहसीलदारांवर लोकायुक्त छापा
Advertisement

निपाणी, अथणी, मुडलगी येथे कारवाई : महसूल विभागात खळबळ : पहाटेपासून 12 तास कसून चौकशी 

Advertisement

उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता असल्याच्या संशयावरून निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या घरांसह तहसीलदार कार्यालयावर लोकायुक्त पथकांनी बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी धडक कारवाई केली. पहाटेपासून सुरू झालेल्या या कारवाईमुळे निपाणीच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तहसीलदारांच्या निवासस्थानासह कार्यालयातील विविध कागदपत्रे व नोंदींची तपासणी करण्यात येत असून या कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत सापडलेली कागदपत्रे आणि मालमत्तेचा तपशील याची माहिती घेण्याचे काम सुरू होते.

 त. भा. प्रतिनिधी

Advertisement

निपाणी : लोकायुक्त विभागाच्या बेंगळूर आणि बेळगाव येथील सहा ते सात पथकांनी बुधवारी पहाटेपासून ही कारवाई सुरू केली. तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या निपाणीतील रामनगर येथील भाडोत्री निवासस्थान, अथणी येथील निवासस्थान, फार्महाऊस, निपाणी तहसीलदार कार्यालय, तसेच मुडलगी येथील त्यांचे सासरे शिवबसू बाळाप्पा हंदीगुंद यांचे निवासस्थान आणि त्यांच्याशी संबंधित एका पतसंस्थेसह सुमारे सहा ते सात ठिकाणी लोकायुक्त पथकांनी तपासणी केली. सर्व ठिकाणी पहाटे एकाचवेळी ही धाड टाकण्यात आली.

तहसील कार्यालयातही तपासणी

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लोकायुक्त अधिकाऱ्यांनी निपाणी तहसीलदार कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयातील विविध विभागांमध्ये जाऊन कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तहसीलदार मुंजे निपाणी कार्यालयात रुजू झाल्याची तारीख, त्यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेली आदेशपत्रे, तसेच तहसीलदारांच्या टेबलवर प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती घेण्यात आली. महसूल विभागाशी संबंधित विविध नोंदी आणि प्रकरणांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडूनही माहिती घेतल्याचे समजते.

तब्बल 12 तास तपासणी

पहाटे सुरू झालेली लोकायुक्तांची कारवाई बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. रामनगर येथील निवासस्थानासह तहसील कार्यालय आणि इतर ठिकाणी पथकांकडून कागदपत्रांची झाडाझडती घेण्यात आली. त्यामुळे दिवसभर महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले होते. तहसीलदारांच्या अधिकारक्षेत्रात शेतीच्या फेरफार नोंदी, खाते उताऱ्यांमधील दुरुस्ती, वारस नोंदी, जमिनीच्या वापरातील बदल, सरकारी जमीन व अतिक्रमण प्रकरणे, जमीन वाटप तसेच जमीन महसूल वसुली यांसह विविध महत्त्वाची कामे येतात. या पार्श्वभूमीवर लोकायुक्तांच्या कारवाईकडे विशेष गांभीर्याने पाहिले जात आहे.

पहाटेपासून घराची झाडाझडती

रामनगर येथील तहसीलदार मुंजे यांच्या निवासस्थानी पहाटेच लोकायुक्त पथक दाखल झाले. घरातील विविध कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी, तसेच मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्याचवेळी अथणी येथील निवासस्थान आणि फार्महाऊसवरही पथकांकडून तपासणी सुरू होती.

तपासणीनंतरच चित्र स्पष्ट होणार

तहसीलदार सुरेश मुंजे यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी एकाचवेळी झालेल्या या कारवाईमुळे निपाणी तालुक्यात दिवसभर चर्चेला उधाण आले होते. लोकायुक्त पथकाने नेमकी कोणती कागदपत्रे किंवा मालमत्तेशी संबंधित नोंदी ताब्यात घेतल्या, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. रात्री उशिरापर्यंत तपास मोहीम सुरू होती. त्यामुळे तपासणीअंती काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.