खानापूर तहसीलदारांवर लोकायुक्त छापा
सुमारे साडेचार कोटींचे घबाड हाती, रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरूच : राज्यात आठ भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्तांचा दणका
बेळगाव : बेळगाव, गदग, बेंगळूरसह राज्यातील आठ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर बुधवारी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या बेळगाव, खानापूर, निपाणी येथील घर, कार्यालयावर छापे टाकण्यात आले असून सुमारे साडेचार कोटींचे घबाड उघडकीस आले आहे. लोकायुक्त पोलीसप्रमुख हणमंतराय यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी सकाळी एकाचवेळी बेळगाव, खानापूर, निपाणी, अकोळ येथील आठ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात घबाड उघडकीस आले असून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती.
खानापूर येथील कार्यालय, घर, निपाणी व अकोळ येथेही तपासणी करण्यात आली असून बेळगाव येथील घरातही अधिकाऱ्यांनी दागिने व कागदपत्रांची पडताळणी केली आहे. या कारवाईत दोन भूखंड, तीन घरे, 28 एकर शेतजमीन, 46 हजार रुपये रोख रक्कम, 25 लाख 66 हजार 585 रुपये किमतीचे दागिने, 57 लाख रुपये किमतीची वाहने अशी एकूण 4 कोटी 41 लाख 12 हजार 585 रुपयांची मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे.
बेंगळूर शहर, चिक्कमंगळूर, बिदर, गदग, तुमकूर, बळ्ळारी, रायचूर येथील पोलीस, महसूल, परिवहन, आरोग्य व कुटुंब कल्याण, लघुपाटबंधारे, नगरपालिका, मागासवर्गीय कल्याण व वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत. राज्यातील आठ अधिकाऱ्यांसंबंधी 38 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईसंबंधी लोकायुक्त पोलीसप्रमुख हनुमंतराय यांच्याशी संपर्क साधला असता रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ बेळगावच नव्हे तर शेजारील जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनाही या कारवाईसाठी जुंपण्यात आले आहे. खानापूर तहसीलदारांच्या निवासस्थानावरील छाप्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
निपाणीतही गायकवाड यांच्या निकटवर्तीयांच्या घरांची झडती
लोकायुक्त खात्याने बुधवारी पहाटे राज्यातील विविध खात्याचे आठ अधिकारी व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर छापे टाकले. यात खानापूर तालुक्याचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांची व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात आली. यात निपाणीतील नवनाथ चव्हाण आणि अकोळ येथील स्वप्नील शिंदे यांच्या घरी लोकायुक्त पथकाने बुधवारी पहाटे छापा टाकला. लोकायुक्त खात्याचे डीएसपी बी. एस. पाटील, अन्नपूर्णा के. यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नवनाथ चव्हाण यांच्या आदर्शनगर येथील घरी छापा टाकून तेथील कागदपत्रांची तपासणी केली. याचवेळी अकोळ येथील स्वप्नील शिंदे यांच्या घरीही लोकायुक्त सीपीआय अजीज कलादगी याच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकत चौकशी केली. बुधवारी दिवसभर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चौकशी चालवली होती. अचानक झालेल्या या छापेमारीची निपाणीत दिवसभर चर्चा सुरू होती.