For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळूर, विजापूरसह 63 ठिकाणी लोकायुक्त छापे

11:17 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
बेंगळूर  विजापूरसह 63 ठिकाणी लोकायुक्त छापे
Advertisement

13 भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका : बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी कारवाई : धाडीत आढळले कोट्यावधींचे घबाड

Advertisement

बेंगळूर : बेंगळूर, म्हैसूर, बिदर, बळ्ळारी, विजापूरसह राज्यातील 63 ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकून 13 भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका दिला. बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी अनेकांजवळ कोट्यावधींचे घबाड आढळून आले आहे. मंगळवारी सकाळपासून धाडसत्र हाती घेण्यात आले. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमविल्यासंबंधी लोकायुक्त संस्थेकडे मागील काही दिवसांपासून तक्रारी दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बेंगळूरसह विविध जिल्ह्यातील एकूण 13 अधिकाऱ्यांच्या मालमत्ता आणि शासकीय कार्यालयांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले. सायंकाळपर्यंत मालमत्तांचा तपशिल जमा करण्याचे काम सुरू होते. बेंगळूरमध्ये तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. बेंगळूरमधील बेंगळूर शहर वीज वितरण निगममधील (बेस्काम) जागृती पथकाचे अधिकारी टी. एन. सुधाकर रे•ाr यांचे निवासस्थान, सहकारी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. एस. कृष्णमूर्ती यांचा बंगला तसेच कार्यालयाची झडती घेण्यात आली.

बेस्कॉमच्या अधिकाऱ्याजवळ 1.5 कोटीचे घबाड

Advertisement

जयनगर येथील बेस्कॉमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर चन्नकेशव यांचे जक्कूर आणि अमृतहळ्ळी येथील निवासस्थानासह 7 मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या. त्यांच्या अमृतहळ्ळी येथील निवासस्थानी 6 लाखांची रोकड, 3 किलो सोने, 28 किलो चांदी, 25 लाखांचे रत्नजडीत दागिने, 5 लाख रुपये किमतीच्या सात पुरातन वस्तू असे घबाड आढळले आहे. या वस्तूंचे मूल्य 1.5 कोटी रुपये इतके होते. चन्नकेशव हे अपार्टमेंट आणि कमर्शिअल बिल्डींगना वीजकनेक्शन देण्यासाठी लाखो रुपयांची लाच घेत होते, असा आरोप आहे. लोकायुक्त अधिकारी झडती घेण्यासाठी घरात असल्याचे समजताच चन्नकेशव यांचा रक्तदाब वाढला. त्यांना त्वरित गोळ्या देण्यात आल्यानंतर प्रकृतीत सुधारणा दिसून आली. नंतर त्यांनी मालमत्तेचा तपशिल जमा करणाऱ्या लोकायुक्त अधिकाऱ्यांना तपासणीवेळी सहकार्य केले.

प्राध्यापकाची बेहिशेबी मालमत्ता

म्हैसूर जिल्ह्यातील नंजनगूड येथील सरकारी पदवी महाविद्यालयातील प्रथमश्रेणी प्राध्यापक महादेवस्वामी यांच्यावर कुटुंबीयांच्या नावे एम. एस. ग्रुप नावाने कंपनी चालवत असल्याचा आरोप आहे. या कंपनीच्या माध्यमातून महादेवस्वामी यांनी बेहिशेबी माया जमविली असल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे लोकायुक्त पथकाने त्यांच्यावर छापे टाकले. ते अध्यापन करत असलेले गुरुकुल विद्यासंस्थेचे महाविद्यालय, निवासस्थान, कार्यालय, व्यापारी संकुलातील स्टील आणि कापडाचे दुकान, नंजनगुडमधील स्टील दुकान या ठिकाणी छापे टाकून तपासणी करण्यात आली. त्यांनी कार पार्किंगसाठी 100 चौरस फूट जागाही इतरांच्या नावे खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे.

क्रेडल अधिकाऱ्यावर बेंगळुरातच 5 ठिकाणी धाडी

क्रेडल (केआरआयडीएल) चे सुपरिटेंडेंट इंजिनिअर तिम्मराजप्पा यांच्या बंगल्यातील एषोआरामी वस्तू पाहून लोकायुक्त अधिकारी आश्चर्यचकीत झाले. तिम्मराजप्पा यांच्या मालकीच्या कोलार, बेंगळूर, बेळगावसह 8 ठिकाणी मालमत्तांवर छापा टाकून तपासणी करण्यात आली. कोलार जिल्ह्यातील केजीएफ तालुक्याच्या महादेवपूर येथील त्यांच्या मूळ गावातील निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता आढळली. तिम्मराजप्पा यांच्यांशी संबंधीत बेंगळूरमधील दोन बंगले, 3 फ्लॅटवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. बळ्ळारी, विजयनगर जिल्ह्यातही कारवाई करण्यात आली. बळ्ळारीतील खाण-भूविज्ञान खात्यातील अधिकारी चंद्रशेखर, वनखात्यातील डीआरएफओ मारुती माने यांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दणका दिला. चंद्रशेखर यांचे होस्पेटमधील निवासस्थान आणि मारुती माने यांचे कंप्ली आणि कोप्पळ जिल्ह्याच्या गंगावती येथील निवासस्थानांना लक्ष्य बनविण्यात आले. उभयतांकडेही मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता आढळली. गंगावती येथील टीचर्स कॉलनीमध्ये पर्यावरण नियंत्रण खात्यातील अभियंते शरणप्पा यांच्यावर लोकायुक्त डीवायएसपी सलीम पाशा यांच्या नेतृत्त्वाखाली छापा टाकण्यात आला.

बिदर, यादगिरीतही कारवाई

बिदरमध्ये पशू वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्मचारी सुनीलकुमार यांचे निवासस्थान तसेच कॉम्प्लेक्सवर धाड टाकण्यात आली. यादगिरीचे डीएचओ डॉ. प्रभूलिंग मानकर यांचे कलबुर्गी योथील निवासस्थान, यादगिरी येथील भाडोत्री घरावर लोकायुक्त डीवायएसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्त्वाखाली छापे टाकण्यात आले. ते भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचे नातलग असल्याचे समजते.

Advertisement
Tags :

.