हुबळीसह राज्यभरात 33 ठिकाणी लोकायुक्त छापे
आठ भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका : बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी कारवाई
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :
बेहिशेबी मालमत्ता संपादनाच्या आरोपावरून लोकायुक्त पोलिसांनी राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. मंगळवारी सकाळी धारवाड, कलबुर्गी, बेंगळूर शहर, बेंगळूर दक्षिण, कोडगू, मंड्या, बिदर, चिक्कबळ्ळापूर, चित्रदुर्गसह विविध जिल्ह्यांतील आठ अधिकाऱ्यांवर 33 ठिकाणी छापे टाकले. यावेळी भ्रष्ट अधिकाऱ्यांजवळील मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि कोट्यावधी रुपयांचे दागदागिने व रोकड जप्त करण्यात आली.
हुबळीतील हेस्कॉम कार्यालयातील साहाय्यक कार्यकारी अभियंता किरणकुमार बैंदूर यांच्याशी संबंधीत चार मालमत्तांवर लोकायुक्त पोलिसांनी छापे टाकून झडती घेतली. लोकायुक्त अधीक्षक सिद्धलिंगप्पा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. किरणकुमार यांची पत्नी प्रीती या देखील हेस्कॉममध्ये अभियंता म्हणून सेवा बजावतात. त्यामुळे हुबळीच्या अक्षयकुमार पार्कमधील त्यांचे निवासस्थान, तबीब लँड येथील किरणकुमार यांचे कार्यालय, प्रीती हे कार्यरत असलेले कोपनकोप्प येथील हेस्कॉमचे कार्यालय आणि किरणकुमार यांच्या भावाच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली.
या कारवाईत एकूण 1.87 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आढळून आली. त्याचप्रमाणे 4,60,850 रु. रोख, 73,71,810 रु. किमतीचे सोन्याचे दागिने, 15.10 लाखांची वाहने असे एकूण 93,42,660 रु. किमतीची जंगम मालमत्ता आढळून आली आहे.
निवृत्त हॉस्टेल वॉर्डनच्या फार्महाऊसमध्ये ‘मिनी बार’
मंड्या येथ मागासवर्ग कल्याण खात्याचे निवृत्त हॉस्टेल वॉर्डन शिवराजू यांचे मद्दूर येथील निवासस्थान व फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला. शिवराजू यांनी फार्महाऊसमध्ये सरकारी हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना वाटप करावयाची पुस्तके, बेडशीट आणि इतर वस्तू बेकायदेशीरपणे जमा करून ठेवल्याचे आढळून आले. इतकेच नव्हे तर फार्महाऊसमध्ये महागड्या मद्याच्या बाटल्याही आढळून आल्या. त्यांच्याजवळ 61.25 लाखांचे पाच भूखंड, 1.50 कोटी रु. किमतीची 5 निवासस्थाने, 4.10 लाख रु. किमतीची 6 एकर शेतजमीन अशी स्थावर मालमत्ता आढळली आहे. त्याचप्रमाणे कारवाईवेळी 2.50 लाख रुपयांची रोकड, 33.80 लाख रुपये किमतीचे 600 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, इनोव्हा आणि टाटा नेक्सॉन कार तसेच बँक ठेवी आढळून आल्या.
कलबुर्गी येथे जेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंत्या राजेश्वरी बाबलाद यांचे कलबुर्गीच्या महालक्ष्मी लेआऊट येथील निवासस्थान, खाद्री सर्कलमधील बंगला व जेस्कॉमचे कार्यालय या ठिकाणी लोकायुक्त पोलिसांनी तपासणी केली.
चिक्कबळ्ळापूरमध्ये प्रथम श्रेणी कर्मचारी दर्शन गौडा यांच्याशी संबंधित बेंगळूरमधील 7 मालमत्तांवर छापे टाकून झडती घेण्यात आली. बेंगळूर शहरातील वाणिज्य संकुलासह आलिशान बंगल्यांवर धाडी टाकण्यात आल्या.
बिदरमध्ये निवृत्त कृषी अधिकारी लक्ष्य
बिदरमध्ये गेल्या महिन्यात निवृत्त झालेले कृषी अधिकारी माणिकराव शेरीकर यांचे बिदर शहरातील हक कॉलनी, हुमनाबादमधील टीचर्स कॉलनी येथील निवासस्थाने, चिटगुप्पा तालुक्यातील मुत्तंगी येथील फार्महाऊसवर एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. यावेळी महत्त्वाचे कागदपत्रे व रोकड जप्त करण्यात आली.
बेंगळूर दक्षिण जिल्ह्यातील जिल्हा रजिस्ट्रार श्रीदेवी, कोडगू जिल्ह्यातील नगरपालिका आयुक्त एच. आर. रमेश, बेंगळूरमधील ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणाचे निवृत्त साहाय्यक अभियंता एच. एम. रंगनाथ यांच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले.