भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्तांचा दणका
बेळगाव, धारवाडसह नऊ जिल्ह्यांमध्ये छापे : कोट्यावधींचे घबाड हाती : दोन सेवानिवृत्त अधिकारीही रडारवर
बेंगळूर : राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्त खात्याने दणका दिला. गुरुवारी पहाटे 11 अधिकाऱ्यांच्या निवासासह कार्यालयांवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत लोकायुक्त पोलिसांना कोट्यावधी रुपयांचे बेकायदा घबाड हाती लागले आहे. उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याच्या आरोपावरून राज्य सरकारच्या विविध खात्यातील 11 अधिकारी आणि दोन सेवानिवृत्त अभियंत्यांच्या एकूण 56 मालमत्तांवर गुरुवारी पहाटे छापे टाकण्यात आले असून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मालमत्ता उघडकीस आली आहे.
लोकायुक्त पोलीस विभागाच्या एसपींसह 100 अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईत सहभागी असून भ्रष्टाचाऱ्यांची संपत्ती शोधण्यात गुंतले आहेत. बेळगाव, धारवाड, कलबुर्गी, म्हैसूर, दावणगेरे, चित्रदुर्ग, कोलारसह 9 जिल्ह्यांमधील 56 ठिकाणी छापे टाकून भ्रष्ट अधिकारी आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची बेकायदा मालमत्तेची कागदपत्रे तपासली जात आहेत. या छाप्यावेळी मोठे घबाड सापडल्याचे समजते.
कोलारचे तहसीलदार विजयण्णा, लघु पाटबंधारे खात्याचे निवृत्त मुख्य अभियंता एम. रवींद्र, म्हैसूर जलसंपदा खात्याचे अधीक्षक अभियंता महेश के., सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता के. जी. जगदीश, धारवाड बांधकाम केंद्राचे योजना सचिव शेखरगौडा, ग्रामीण पेयजल पुरवठा खात्याचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता शिवराजू एस., बेंगळूर महानगरपालिका केंगेरी झोनचे महसूल अधिकारी बसवराज मागी, दावणगेरेचे कार्यकारी अभियंता डी. एच. उमेश, साहाय्यक कार्यकारी अभियंता एम. एस. प्रभाकर, बेळगावचे साहाय्यक कार्यकारी अभियंता महादेव बेन्नूर, हासनच्या एका ग्रामपंचायतीचे ग्रेड-1 सचिव एन. एम. जगदीश यांचे निवासस्थान, कार्यालय, नातेवाईकांच्या निवासासह विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. धारवाडमध्ये दोन ठिकाणी पीजी असलेल्या बांधकाम केंद्राचे योजनाधिकारी शेखरगौडा यांच्या निवासासह कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. धारवाडच्या केसीडी रोडवरील सप्तापूर आणि राधाकृष्ण नगर येथे त्यांच्या पीजी असून दोन्ही ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले आहेत.
रामनगरमध्येही कारवाई
रामनगर जिल्ह्यातील अरोहळ्ळीचे तहसीलदार विजयण्णा यांच्याशी संबंधित सहा ठिकाणी लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला आहे. चिक्कबळ्ळापूर, चिंतामणी आणि तुमकूर येथे प्रत्येकी दोन, रामनगरातील अरोहळ्ळी आणि मंड्या येथील एका ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. विजयण्णा यापूर्वी कोलारचे तहसीलदार होते. कोलारचे लोकायुक्त एसपी उमेश यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला असून कागदपत्रांची पडताळणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सेवानिवृत्त अधिकारीही कचाट्यात
बेंगळूर महानगरपालिकेच्या केंगेरी विभागाचे महसूल अधिकारी बसवराज मागी यांच्या बेंगळूर आणि कलबुर्गी येथील एमबी नगर येथे असणाऱ्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला आहे. शहरातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता शिवराजू यांनाही लोकायुक्त पोलिसांनी दणका दिला आहे. एसपी सुरेश बाबू यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने जिल्ह्याच्या नागमंगल तालुक्मयातील इज्जलघट्ट गावातील घर, फार्महाऊस, क्रशर आणि म्हैसूर येथील शिवराजू यांच्या जावयाच्या घरासह विविध ठिकाणी तपासणी सुरू असल्याचे लोकायुक्त पोलिसांनी सांगितले.
दावणगेरे येथेही छापे
दावणगेरे येथे स्थायिक झालेले चिक्कमंगळूर जिल्ह्याच्या केपीटीसीएलचे कार्यकारी अभियंता डी. एच. उमेश आणि दावणगेरे बेसकॉमचे दक्षता अधिकारी एईई प्रभाकर यांच्या घरांवर लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला असून कागदपत्रांची तपासणी केली. लाचखोर, भ्रष्ट कारभार आणि बेकायदेशीरपणे मालमत्ता संपादन केल्याची माहिती दिल्यानंतर लोकायुक्त अधिकारी कौलापुरे यांच्या नेतृत्वाखाली एकूण आठ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांनी दावणगेरे, चिक्कमंगळूरसह राज्यभरात बेकायदेशीर मालमत्ता संपादन केल्या असून त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवरही छापे टाकून लोकायुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली.
छापा टाकण्यात आलेले भ्रष्ट अधिकारी
- विजयण्णा, तहसीलदार-कोलार
- एम. रवींद्र, लघु पाटबंधारे खात्याचे निवृत्त मुख्य अभियंता
- महेश के., म्हैसूर जलसंपदा खात्याचे अधीक्षक अभियंता
- के. जी. जगदीश, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता
- शेखरगौडा, धारवाड बांधकाम केंद्राचे योजना सचिव
- शिवराजू एस., ग्रामीण पेयजल पुरवठा खात्याचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता
- बसवराज मागी, केंगेरी झोनचे महसूल अधिकारी
- डी. एच. उमेश, दावणगेरेचे कार्यकारी अभियंता
- एम. एस. प्रभाकर, साहाय्यक कार्यकारी अभियंता
- महादेव बेन्नूर, बेळगावचे साहाय्यक कार्यकारी अभियंता
- एन. एम. जगदीश, ग्रामपंचायतीचे ग्रेड-1 सचिव