लोकायुक्त पोलीस अचानक मनपात दाखल
आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासमवेत चर्चा
बेळगाव : महानगरपालिकेत शुक्रवारी अचानकपणे लोकायुक्त पोलीस दाखल झाल्याने पुन्हा गोंधळ उडाला. मागीलवेळी लोकायुक्त पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून प्रलंबित असलेल्या कामांची माहिती घेऊन ती कामे तातडीने निकालात काढण्याची सूचना केली होती. त्यानंतर शुक्रवारी लोकायुक्त जिल्हा पोलीसप्रमुख हणुमंतराय व त्यांचे सहकारी मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या कक्षात दाखल झाले होते. महानगरपालिकेबद्दल दिवसेंदिवस तक्रारी वाढत चालल्या आहेत. अनेक कामे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांनी लोकायुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याची दखल घेऊन दीड महिन्यापूर्वी अचानकपणे धाड घालण्यात आली होती. मात्र शुक्रवारी केवळ आयुक्तांबरोबरच लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. याबाबत महानगरपालिका आयुक्तांना विचारले असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल जनतेच्या तक्रारी वाढल्या आहेत. विविध प्रकरणे लोकायुक्तांकडे प्रलंबित आहेत. लोकायुक्त पोलीसप्रमुख प्रलंबित असलेल्या तक्रारींवर चर्चा करण्यासाठीच आयुक्तांकडे गेल्याचे बोलले जात असले तरी आयुक्तांनी अधिक माहिती दिली नाही.