सिद्धरामय्या यांना लोकायुक्त नोटीस
मुडा प्रकरणी उद्या चौकशीला हजर राहण्याची सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या (मुडा) कथित बेकायदा भूखंड प्रकरणामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी बी. एम. पार्वती यांची लोकायुक्त पोलिसांनी चौकशी केली होती. आता लोकायुक्त विभागाने सिद्धरामय्या यांना चौकशीला बोलावले असून सोमवारी नोटीस बजावली आहे. 6 नोव्हेंबर रोजी चौकशीला म्हैसूरमधील लोकायुक्त कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली आहे.
मुडाच्या भूखंड वाटप प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे पहिले आरोपी आहेत. सध्या राज्यात वक्फ मालमत्ता आणि विधानसभेची पोटनिवडणूक हे मुद्दे चर्चेत आहेत. असे असताना पुन्हा एकदा मुडा प्रकरण चर्चेत आले आहे. सिद्धरामय्या यांच्या 40 वर्षांच्या राजकारणात एका गैरव्यवहारावरून चौकशीला सामोरे जाण्याची पहिल्यांदाच अनिवार्य स्थिती ओढवली आहे. लोकायुक्त विभागाने यापूर्वी प्रकरणातील दुसरे आरोपी पी. एम. पार्वती, मल्लिकार्जुन स्वामी, देवराजू तसेच मुडाच्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून चौकशी केली आहे. आता केवळ सिद्धरामय्यांची चौकशी बाकी आहे. त्यामुळे त्यांना 6 नोव्हेंबर रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
मुडा प्रकरणी सर्वप्रथम तक्रार केलेल्या स्नेहमयी कृष्ण यांनी लोकायुक्त पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना लहान-लहान चोरट्यांना पकडता. मात्र, सिद्धरामय्यांविरुद्ध तक्रार दाखल झाली तरी त्यांची चौकशी केली जात नाही. त्यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी केली होती. शिवाय लोकायुक्त पोलिसांकडून मुडा प्रकरणाचा योग्य तपास होत नसल्याचे आरोप केले होते.
चौकशीला हजर राहणार : सिद्धरामय्या
दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चौकशीला हजर राहणार असल्याची प्रतिक्रिया हावेरी जिल्ह्याच्या सवनूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे. मात्र, नोटिशीबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.