मुडा प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची ‘लोकायुक्त’ चौकशी
प्रतिनिधी/ बेंगळूर
म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या (मुडा) कथिक बेकायदा भूखंड वाटप प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पत्नी बी. एम. पार्वती यांची शुक्रवारी लोकायुक्त पोलिसांनी चौकशी केली. सुमारे दोन तास चौकशी करण्यात आल्याचे लोकायुक्तच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
मुडा प्रकरणी सिद्धरामय्यांविरुद्ध चौकशी करण्यासाठी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिलेली परवानगी योग्यच असल्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25 सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी बी. एम. पार्वती, मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी, जमीन मालक देवराजू व इतरांविरुद्ध लोकायुक्त पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.
मुडाने पार्वती यांना 14 भूखंड बेकायदेशीरपणे दिले आहेत, असा आरोप करण्यात आला असून लोकायुक्त पोलिसांनंतर ईडीने देखील चौघांविरुद्ध गुन्हा (ईसीआयआर) दाखल केला होता. त्यानंतर लोकायुक्त पोलिसांनी दोन आठवड्यापूर्वी मल्लिकार्जुन स्वामी आणि देवराजू यांना समन्स बजावून चौकशीला हजर राहण्याची सूचना दिली होती.
मुडा कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, पार्वती यांना शुक्रवारी चौकशीला बोलावून घेण्यात आले. कागदपत्रावर व्हाईटनर लावून का दुरुस्ती केली, असा प्रश्न लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पार्वती यांना विचारला. त्यावर पार्वती यांनी मला सरकारप्रमाणे पत्र लिहिता येत नाही. काहीतरी चुकीचे लिहिल्याचे समजल्यानंतर व्हाईटनर लावून दुरुस्ती केल्याचे उत्तर दिले आहे.
तुम्ही अनेक ठिकाणी केलेल्या स्वाक्षऱ्यांमध्ये फरक आहे, कारण काय, या प्रश्नावर पार्वती यांनी मी कधीही स्वाक्षरी करत नाही. क्वचितच स्वाक्षरी करते. त्यामुळे स्वाक्षरीमध्ये फरक झाला असावा, असे उत्तर दिले.