लोकायुक्तांची सात ठिकाणी छापेमारी
जिल्हा नगरविकास कक्षाच्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्याकडे पावणे चार कोटींचे घबाड
बेळगाव : उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक माया गोळा केल्याप्रकरणी बेळगाव जिल्हा नगरविकास कक्षाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता अजयसिंग बापूसिंग रजपूत यांच्या सरकारी कार्यालयासह खासगी अशा एकूण सात ठिकाणी लोकायुक्तांनी मंगळवारी एकाचवेळी छापेमारी केली. त्यांच्याकडे एकूण 3 कोटी 79 लाख 92 हजार 250 रुपयांचे घबाड आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात लोकायुक्त पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकायुक्त पोलिसांकडून बेळगाव जिल्ह्यासह राज्यभरात मंगळवारी सरकारी अधिकाऱ्यांवर छापेमारी केली. यावेळी उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक माया गोळा करणाऱ्या भ्रष्ट सरकारी बाबूंना लक्ष्य करण्यात आले. राज्यभरात लोकायुक्तांनी केलेल्या कारवाईमुळे सरकारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नगरविकास कक्षात साहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले अजयसिंग बापूसिंग रजपूत यांनी देखील आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक माया गोळा केली आहे, अशी माहिती लोकायुक्त पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी कोठे कोठे आपली मिळकत ठेवली आहे याची बारीक माहिती घेऊन मंगळवारी लोकायुक्तचे जिल्हा पोलीस प्रमुख हनुमंतराय, पोलीस उपअधीक्षक भरत रेड्डी, बी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधी एकूण सात ठिकाणी छापेमारी करून मिळकतीची मोजदाद केली. सायंकाळपर्यंत स्थावर व जंगम मालमत्तेची मोजदाद सुरू होती.
त्यांच्याकडे 60 लाख रुपये किमतीचे सात भूखंड, 1 कोटी 97 लाख 3 हजार रुपये किमतीची तीन घरे, 10 लाख 35 हजार रुपये किमतीची 12 एकर शेतजमीन, 6 लाख 22 हजार रुपयांची रोकड, 48,01,750 रुपये किमतीचे 498.25 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, 6 लाख 30 हजार 500 रुपये किमतीचे 3211 ग्रॅमचे चांदीचे दागिने, 19 लाख रुपये किमतीची एक कार व मोटारसायकल, 2 कोटी 35 लाख रुपयांच्या ठेवी आढळून आल्या आहेत. असे एकूण त्यांच्याकडे 3 कोटी 78 लाख 92 हजार 250 रुपयांचे घबाड आढळून आले आहे.