Lokari Kachola: पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या लोकरी काचोळ्याच्या व्यवसायाला का बसतोय फटका?
परिणामी काचोळा व्यवसायाला एक प्रकारे घरघर लागली आहे
By : युवराज भित्तम
म्हासुर्ली : दुर्गम डोंगराळ, अति पावसाच्या ग्रामीण भागातील शेतकरी पाऊस, सोसाट्याचा वारा, झोंबणाऱ्या थंडीपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी बकऱ्यांच्या लोकरीपासून बनवलेल्या काचोळा (सदरा) वापरतात. मात्र सध्या शेतकरी शेतीकाम करताना काचोळ्या ऐवजी प्लास्टिक रेनकोटचा वापरू लागल्याने काचोळ्याची मागणी घटू लागली आहे. परिणामी काचोळा व्यवसायाला एक प्रकारे घरघर लागली आहे.
पश्चिमेकडील दुर्गम भाग सह्याद्री पर्वत रांगा व जंगलांनी व्यापलेला असून घाटमाथ्यावर वसल्याने मुसळधार पावसाचा प्रदेश आहे. अशा दुर्गम भागात शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेतात चिखल करून भाताची रोप लागण करतात. पावसाळ्यातील चार महिने या परिसरात मुसळधार पाऊस व अंगला झोंबणारा सोसाट्याचा वारा, थंडी प्रचंड जाणवते.
अशा थंडी वाऱ्यापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी येथील शेतकरी शेतात काम करताना, अंगावर पडणारे पावसाचे पाणी निचरूण जाण्यासाठी व शरीरास उबदारपणा मिळविण्यासाठी बकऱ्यांच्या लोकरी पासून बनवलेला काचोळा (सदरा) अंगावर परिधान करणाकडे विशेष लक्ष देतात.
तसेच उंच डोंगर पठारी भागातील शेतकरी अंगातील काचोळ्याबरोबरच डोक्यावर बकऱ्याच्या लोकरीपासून बनवलेल्या घोंगड्याची खोळ करुन वापर करायचे. मात्र घोंगड्याची जागा गेल्या ४० वर्षात प्लास्टिकच्या कागदी खोळेने घेतली आहे. त्यामुळे घोंगड्याचा वापर ही घरादारात अंथरुण व पांगरुन म्हणून अल्प प्रमाणात होत आहे.
यासर्व प्रकारात शेतीत काचोळ्याचा वापर टिकून होता. मात्र अलीकडील काळात शेती व्यवसायात आधुनिकता आल्याने बैल औताची जागा यंत्रांनी घेतली. तशाच प्रकारे लोकरी काचोळ्याची जागा प्लास्टिक कागद व प्लास्टिक रेनकोटने घेतली आहे. बाजारात सहज वीस - तीस रुपयाला मिळणारे प्लास्टिक कागद तर ९०-१०० रुपयाला भेटणारे प्लास्टिक रेनकोट (सदरे) शेतकऱ्यांना आपलेसे वाटत आहेत.
त्यामुळे काचोळा उत्पादन व्यवसायाला घरघर लागली आहे.सध्या बाजारात लोकरी काचोळ्याची किमंत ३०० पासून ५०० रुपयापर्यत आहे. काही शेतकरी वर्ग काचोळ्याचा वापर पावसाळ्या प्रमाणेच हिवाळ्यात थंडीपासून रक्षण करण्यासाठी करतात. तर घोंगडी अंथरुण व पांगरुन म्हणून वापरतात.
लोकरी काचोळ्याची मागणी घटली..!
"लोकरीचा घोंगडी - काचोळा व्यवसायाबद्ल तरूण भारत संवादशी बोलताना विक्रेता दगडू सणगर म्हणाले जिल्ह्यात काही ठिकाणी आज ही लोकरी व्यवसाय टिकून असून आपल्या म्हारुळ गावात पंधरा ते वीस कुंटूंबिय व्यवसाय करतात. काचोळा, घोंगडी बनवणे हा प्रमुख धंदा आहे.
आपण गेली पन्नास वर्षे हा धंदा करत असून आधुनिक बाजारात अनेक पर्याय आल्याने लोकरी काचोळ्याची मागणी घटली आहे. पाच-दहा वर्षापूर्वी ५००ते ७०० काचोळा नगांची विक्री व्हायची. आता तेच संख्या ५०-१०० वर आली आहे. त्यामुळे लोकरी काचोळा व्यवसाय अडचणीत सापडला आहे."
- दगडू सणगर, काचोळा-घोंगडी विक्रेता