For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोककल्प फाउंडेशनला राष्ट्रीय स्तरावर ‘इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट एक्सलन्स पुरस्कार’

01:25 PM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोककल्प फाउंडेशनला राष्ट्रीय स्तरावर ‘इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट एक्सलन्स पुरस्कार’
Advertisement

पश्चिम घाटातील दुर्गम भागात भरीव समाजकार्याची दखल : नि:स्वार्थ सेवाभाव-प्रामाणिक प्रयत्न

Advertisement

नवी दिल्ली : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा सामाजिक बांधिलकी उपक्रम असलेल्या ‘लोककल्प फाउंडेशन’ला ग्रामीण भागातील उत्कृष्ट कार्यासाठी अत्यंत मानाचा ‘इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट एक्सलन्स (एकात्मिक ग्रामीण विकास उत्कृष्टता) पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. पश्चिम घाटातील दुर्गम आणि वनक्षेत्रातील गावांमध्ये राबविलेल्या ‘एम्पॉवरिंग द वेस्टर्न घाट्स’ (पश्चिम घाटाचे सक्षमीकरण) या विशेष मोहिमेसाठी संस्थेला हा पुरस्कार बहाल करण्यात आला.

नवी दिल्लीत आयोजित एका शानदार सोहळ्यात प्रमुख अतिथी दिल्ली सरकारचे समाजकल्याण उपसंचालक राजीव सक्सेना, प्रसिद्ध सीएसआर व्यावसायिक असीम खान आणि ‘हर्बचिक्स’चे संस्थापक अंकित अहलावत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोककल्प फाउंडेशनचे संस्थापक आणि संचालक डॉ. किरण ठाकुर यांच्यावतीने लोकमान्य सोसायटीचे लाजपत नगर (दिल्ली) येथील वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विवेक कुमार यांनी हा सन्मान स्वीकारला.

Advertisement

दुर्गम गावांमध्ये परिवर्तन

लोककल्प फाउंडेशनचे संस्थापक डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था खानापूर तालुक्यातील कणकुंबी आणि जांबोटीतील घनदाट जंगलांनी वेढलेल्या 32 दुर्गम गावांमध्ये कार्यरत आहे. अत्यंत आव्हानात्मक भौगोलिक परिस्थिती असलेल्या या भागातील ग्रामीण आणि आदिवासी बांधवांच्या जीवनात शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी संस्था शिक्षण, आरोग्य, उपजीविका (रोजगार) आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देत आहे. स्थानिक गरजा ओळखून थेट गावांमध्ये जाऊन उपाययोजना करण्याच्या लोककल्पच्या पद्धतीमुळे हजारो वंचित कुटुंबांना स्वावलंबी बनण्यास मदत झाली आहे.

शिक्षण व पायाभूत सुविधा

दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची आणि मोलाची मदत पुरविण्यात आली असून, वीज नसलेल्या अनेक घरांमध्ये सौर ऊर्जेद्वारे प्रकाश पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागात जलसंधारणासाठी तलाव आणि पाण्याच्या पायाभूत सुविधा यशस्वीपणे निर्माण करण्यात आल्या आहेत.

महिला सक्षमीकरण

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आणि त्यांना सक्षम उद्योजिका म्हणून विकसित करण्यासाठी संस्थेने विशेष पाठबळ व मार्गदर्शन दिले आहे. राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या या पुरस्कारामुळे लोककल्प फाउंडेशनच्या नि:स्वार्थ सेवाभावाला आणि पश्चिम घाटातील त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना मोठी पावती मिळाली आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आरोग्य क्षेत्रातील क्रांती

आरोग्य मोहिमेंतर्गत संस्थेने दुर्गम गावांमध्ये अनेक वैद्यकीय शिबिरांचे यशस्वी आयोजन केले असून, याद्वारे हजारो वंचित लाभार्थ्यांना मोफत औषधोपचार आणि चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, एचआयव्हीग्रस्त रुग्णांना वैद्यकीय उपचार आणि ग्रामीण महिलांमध्ये मासिक पाळीच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे अत्यंत संवेदनशील व कौतुकास्पद कार्य संस्थेने केले आहे.

Advertisement
Tags :

.