For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभा अध्यक्षपद भाजपलाच?

06:45 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकसभा अध्यक्षपद भाजपलाच
Advertisement

मित्रपक्षांकडून स्पष्टांकेत, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला एकसंध ठेवण्याचा निर्धार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून लोकसभेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्याच लोकप्रतिनिधीची निवड केली जाईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून ते ज्याची निवड करतील, तोच लोकसभेचा अध्यक्ष होईल, असे संकेत भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रश्नावर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंधच राहणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

Advertisement

26 जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. आजवरच्या इतिहासात या पदासाठी कधी निवडणूक झालेली नाही. प्रत्येक वेळी ही निवड सर्वानुमतेच झाली आहे. हाच पायंडा याहीवेळी राहील, असे दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी तेलगु देशम, संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक असणाऱ्या सर्व पक्षांच्या नेत्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असून या विषयावर मोकळेपणाने चर्चा करण्याचे निमंत्रण दिले आहे.

मित्रपक्षांचे पूर्ण समर्थन

भारतीय जनता पक्षाकडून आम्हाला चर्चेचे निमंत्रण मिळाले आहे. या पदासाठी मित्रपक्षांनी त्यांच्या सूचना कराव्यात असे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आवाहन केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही एकसंध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे नाव निवडतील त्याचे आम्ही समर्थन करु, असे सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांनी वृत्तसंस्थांशी बोलताना स्पष्ट केल्याची माहिती या वृत्तसंस्थांनी दिली आहे. कोणत्याही मित्रपक्षाने कोणत्याही विशिष्ट नावाचा आग्रह धरलेला नाही. त्यामुळे ही निवड अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

रालोआ एकसंधच राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकसंधपणे काम करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याची निवड करतील, त्याला सर्व मित्रपक्षांचा पाठिंबा मिळेल, असा निरोप मित्रपक्षांनी भारतीय जनता पक्षाला पाठविल्याचे वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे. भारतीय जनता पक्षाने या प्रश्नावर लहान मित्रपक्षांसह सर्व मित्रपक्षांना विश्वासात घेतले आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा अध्यक्षपदासाठी नाव निश्चित करावे आणि त्यावर मित्रपक्षांचे समर्थन मिळविण्यासाठी चर्चा करावी, अशी सूचना काही मित्रपक्षांनी केल्याचेही वृत्त एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिले आहे. एकंदर, या प्रश्नावर सत्ताधारी आघाडीकडून सामोपचारानेच निर्णय घेतला जाण्याची स्थिती सध्या आहे.

24 जूनपासून विशेष अधिवेशन

अठराव्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ही लोकसभा स्थापन करण्यासाठी 24 जूनपासून लोकसभेच्या विशेष अधिवेशनाचा प्रारंभ होत आहे. 24 जून आणि 25 जून या दोन दिवसांमध्ये सर्व नवनिर्वाचित खासदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल. 24 जूनला प्रथम अस्थायी अध्यक्षांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून केली जाईल. अस्थायी अध्यक्ष सर्व सदस्यांना शपथ देतील. 25 जूनला दुपारी 12 वाजेपर्यंत लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज आणि समर्थनपत्रे सादर करता येतील. आवश्यकता भासल्यास 26 जूनला या पदासाठी निवडणूक घेण्यात येईल. लोकसभेच्या सचिवालयाने हा कार्यक्रम निर्धारित केला असल्याची माहिती देण्यात आली.

मित्रपक्षांपैकी एकाला उपाध्यक्षपद...

लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधीला सर्व मित्रपक्षांनी पाठिंबा द्यावा. मित्रपक्षांपैकी एकाच्या प्रतिनिधीला लोकसभेचे उपाध्यक्षपद दिले जाईल, असा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाकडून मांडण्यात आल्याचे आणि हा प्रस्ताव मित्रपक्षांना मान्य होईल, असे वातावरण दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिणामी, अध्यक्षांची निवड सुरळीत होण्याची दाट शक्यता आहे. सत्ताधारी आघाडी या प्रश्नावर एकसंध राहिल्यास अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची वेळही येणार नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

विरोधी पक्षांची रणनीती

विरोधी पक्षांनी सध्यातरी लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या प्रश्नावर ‘थांबा आणि वाट पहा’ ही भूमिका घेतल्याचे दिसते. सत्ताधारी आघाडीचा निर्णय झाल्यानंतर विरोधी पक्ष त्यांच्या हालचाली करणार आहेत. सत्ताधारी आघाडीचा निर्णय एकमताने झाल्यास विरोधी पक्षांकडून या पदासाठी उमेदवार न दिला जाण्याची शक्यता आहे. तशा परिस्थितीत परंपरेनुसार लोकसभा अध्यक्षांची निवड निर्विरोध होईल. या संदर्भात 25 जून च्या दुपारी 12 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.

रालोआत एकमत शक्य

ड भाजपच्याच उमेदवाराला लोकसभा अध्यक्षपदासाठी पाठिंबा शक्य

ड कोणत्याही परिस्थितीत सत्तधारी आघाडी एकसंध ठेवण्याचा निर्धार

ड भाजपच्या प्रस्तावावर मित्रपक्षांचे एकमत झाल्याची सूत्रांाची माहिती

Advertisement
Tags :

.