For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटकात दोन टप्प्यात लोकसभा निवडणुका

06:50 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटकात दोन टप्प्यात लोकसभा निवडणुका
Advertisement

कर्नाटक मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना यांची माहिती : पहिला टप्पा 26 एप्रिलला तर दुसरा 7 मे रोजी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यातील 28 लोकसभा मतदारसंघांसाठी 26 एप्रिल आणि 7 मे रोजी दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. याचबरोबर सुरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती कर्नाटक मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना यांनी दिली. बेंगळुरात पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. तसेच आचारसंहिता, सुरक्षा, बंदोबस्त, निवडणुकीची तयारी याबाबत सविस्तर माहिती दिली.

Advertisement

मनोजकुमार मीना पुढे म्हणाले, कर्नाटकात लोकसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. राज्यातील 28 लोकसभा मतदारसंघांपैकी पहिल्या टप्प्यात 14 मतदारसंघ आणि दुसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघात निवडणूक होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 14 मतदारसंघांसाठी 26 एप्रिलला आणि दुसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 14 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी निकाल लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होणार असून निवडणुकीची अधिसूचना 28 मार्चला जारी होणार आहे. उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल असेल. यानंतर अर्जाची छाननी होणार आहे. याचबरोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 8 एप्रिल शेवटचा दिवस असून 14 जागांसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, असे मनोजकुमार मीना यांनी स्पष्ट केले.

याशिवाय दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना 12 एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार असून 19 एप्रिल हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. 20 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 22 एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. यानंतर उर्वरित 14 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे.

सुरपूर विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्यातील एका विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. सुरपूरचे आमदार राजा व्यंकटप्पा नाईक यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासह पोटनिवडणूक होणार आहे. 7 मे रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.

5.42 कोटी मतदार बजावणार हक्क

कर्नाटकमध्ये लोकसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार असून राज्यात एकूण 5.42 कोटी मतदार आहेत. यापैकी पुरुष मतदारांची संख्या 2,71,21,407 तर महिला मतदारांची संख्या 2,70,81,748 इतकी आहे. 4,933 तृतीयपंथींयांसह राज्यात एकूण 5,42,08,088 मतदार आपला हक्क बजावणार आहे. यापैकी बेंगळूर उत्तर मतदारसंघात सर्वाधिक 31,74,098 मतदार आहेत. तर उडुपी-चिक्कमंगलूरमध्ये सर्वात कमी 15,72,958 मतदार आहेत. बेंगळूर ग्रामीणमध्ये 27,63,910, बेंगळूर सेंट्रलमध्ये 23,98,910 तर बेंगळूर दक्षिणमध्ये 23,17,472 मतदार आहेत.

राज्यातील निवडणूक प्रक्रिया

 पहिला टप्पा दुसरा टप्पा

मतदारसंघ              14    14

अधिसूचना जारी   28 मार्च  12 एप्रिल

उमेदवारी अर्जांसाठी मुदत  4 एप्रिल  19 एप्रिल

अर्जांची छाननी     5 एप्रिल   20 एप्रिल

उमेदवारी अर्ज माघार  8 एप्रिल  22 एप्रिल

मतदानाची तारीख        26 एप्रिल         7 मे

मतमोजणी तारीख        4 जून      4 जून

Advertisement
Tags :

.