खानापूर न्यायालयात 12 जुलै रोजी लोकअदालतीचे आयोजन
पक्षकारांनी लोकअदालतीत सहभागी होऊन न्याय मिटवून घेण्याचे आवाहन
खानापूर : खानापूर न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत कर्नाटक राज्य लिगल सर्व्हीस अॅथॉरिटी तसेच खानापूर न्यायालय यांच्यावतीने खानापूर न्यायालयात दि. 12 जुलै रोजी लोकअदालत भरवण्यात येणार आहे. या लोकअदालतीत कौटुंबिक, स्थावर प्रॉपर्टी मालमत्ता, धनादेश न वटणे, सहकारी संस्थांच्या कर्जफेडीची देवाणघेवाण यासह इतर सर्व प्रकाराच्या वादावर तोडगा काढण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश चंद्रशेखर तळवार यांनी नुकताच बोलावलेल्या नागरिक आणि पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. न्यायाधीश वीरेश हिरेमठ तसेच तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी, केशव कळळेकर व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी म्हणाले, खानापूर तालुक्यात अनेक प्रलंबित प्रकरणे आहेत. यापूर्वी अनेकवेळा लोकअदालत आयोजन करून अशा प्रकरणांवर तोडगे काढण्यात आले आहेत.
याचा तालुक्मयातील अनेक ग्राहकांनी लाभ घेतला आहे. अनेकांचे संसार लोकअदालतीतून तोडगा काढून सुखी बनले आहेत. सहकारी पतसंस्थांच्या देवाणघेवाणीची प्रकरणे तडजोडीने पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे या लोकअदालतीचा सर्वसामान्य लोकांना तसेच सहकारी संस्थांना देखील याचा फायदा होणार आहेत. यासाठी येत्या 12 जुलै रोजी होणाऱ्या या लोकअदालतीत ज्या ग्राहकांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत अशांनी उपस्थित राहून या अदालती अंतर्गत तोडगा काढून न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या बैठकीला अॅड. लोकरे, अॅड. इर्शाद नाईक, अॅड. जी. जी. पाटील, अॅड. सिद्धार्थ कपिलेश्वरी, अॅड. मारुती कदम, अॅड. आर. एन. पाटील यासह वकील आणि पतसंस्थेचे पदाधिकारी आणि सेक्रेटरी उपस्थित होते.