केतन हत्या प्रकरण; सरप्राइज बर्थडेचा बहाणा अन् लोहगडावर खुनाचा कट; पोलिसांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा
पुणे : व्यावसायिक केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून खून करण्यासाठी त्याची नियोजित वधू सिया गोयल, तिचा प्रियकर चेतन चौधरी आणि त्याचा मित्र रितेश हंगे यांनी ‘माही’ नावाच्या बनावट समाजमाध्यम खात्याचा वापर केल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे.
पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, आरोपींनी ‘माही’ ही सियाची मैत्रीण असल्याचे भासवले. तिच्या वाढदिवसाचे ‘सरप्राइज’ सेलिब्रेशन करण्याच्या बहाण्याने केतनला तिसऱ्यांदा लोहगडावर बोलावण्यात आले. याच ठिकाणी खुनाचा कट अंमलात आणल्याचा पोलिसांचा दावा आहे.
केतन अग्रवाल याचा 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सिया प्रवीण गोयल, चेतन बाबुलाल चौधरी आणि रितेश संजय हंगे या तिघांना अटक केली.
या तिघांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी तब्बल 5 हजार 53 पानांचे आरोपपत्र शनिवारी वडगाव मावळ सत्र न्यायालयात दाखल केले. बनावट समाजमाध्यम खाते तयार करण्यापासून केतनला लोहगडावर बोलावण्यापर्यंतच्या घटनाक्रमाचा तपशील आरोपपत्रात नमूद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणातील पुढील न्यायालयीन कार्यवाही आता वडगाव मावळ सत्र न्यायालयात होणार आहे.