‘गृह’ खात्याच्या दणक्याने लोढा ‘हाऊस’ नरमले!
गोमंतकीयांकडून सरकारचे ‘अभिनंदन’ : लोढाने आक्षेपार्ह जाहिरात हटविली
पणजी : गोवा जिंकण्याची भाषा बोलणाऱ्या अभिनंदन लोढा कंपनीला प्रशासनाकडून दणका मिळताच त्यांनी गोमंतकीयांसमोर नतमस्तक होत आपली वादग्रस्त जाहिरात मागे घेतली. तरीही जाहिरातीतील ‘ते’ शब्द आपले नसून भागिदार कंपनीकडून लिहिण्यात आले होते, अशी सारवासारव करण्यासही ते विसरले नाहीत. ‘देशावर राज्य करणारी दिल्ली, आता गोव्यावर अधिराज्य गाजवत आहे’, अशा अत्यंत आक्षेपार्ह शब्दांनी सजविलेली जाहिरात ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या कंपनीकडून देशभरात प्रसिद्ध करण्यात आली होती. गत मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीमुळे राज्यभरातून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. त्याचे पडसाद प्रशासनातही उमटले होते.
या लोढा कंपनीने डिचोली तालुक्यात कारापूर येथे प्रचंड मोठी जमीन खरेदी केली असून तेथे सुमारे 1400 बंगलेवजा घरांचा गाव वसविण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. अशा या प्रकल्पाकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत होती. मात्र त्या जाहिरातीनेच या कंपनीचे गोव्यासंबंधीचे भविष्यातील मनसुबे उघडकीस आणले व त्यातून येथील अनेक राजकीय विरोधक, सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांतून संतापाची लाट उसळली होती. या प्रकारातील गांभीर्य ओळखून स्वत: मुख्यमंत्र्यानीही संताप व्यक्त केला होता व सदर जाहिरात तात्काळ मागे घेण्याचे आदेश देण्यात यावे, असे निर्देश गृह खात्याला दिले होते.
त्यानुसार दि. 12 सप्टेंबर रोजी खात्याने वादग्रस्त तेवढीच आक्षेपार्ह जाहिरात हटविण्याचा आदेश दिला होता. तसेच त्यात दिरंगाई केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी गोमंतकीयांनी उभारलेल्या स्वातंत्र्यलढ्याचा समृद्ध इतिहास असलेल्या गोव्याला अशा प्रकारच्या अपमानास्पद संदेशांना सामोरे जावे लागू नये, असेही यातून सूचविण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार गृह खात्याच्या अवर सचिवांकडून सदर कंपनीला पत्र पाठविण्यात आले होते. आपल्या जाहिरातीतील मजकुरामुळे मुक्त गोव्यातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा उल्लेख त्या पत्रातून करण्यात आला होता. सदर पत्र हाती पडताच कंपनीने कोणतेही आढेवेढे न घेता गोमंतकीयांसमोर नतमस्तक होताना ‘आपणाकडून जनभावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी असावी’, असे म्हटले होते.