माणसाने स्वत:ला फळाच्या आशेच्या पिंजऱ्यात कोंडून घेतलेले असते
निरपेक्षतेने वाट्याला आलेले कर्म करून मिळणारे फळ ईश्वराला अर्पण करावे म्हणजे भगवंतांनी सांगितलेल्या कर्मयोगाचे यथायोग्य आचरण केल्यासारखे होते. जीवनभर अशा पद्धतीने कार्य करणारा मनुष्य केलेल्या कर्मातून मिळणाऱ्या नाशवंत फळांना विटून आपोआपच संन्यासी होतो. त्यामुळे त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होते असं भगवंतांनी पाचव्या अध्यायात विटला विषयी जाणे अंतरी सुख काय ते । ब्रम्ही मिसळला तेंव्हा भोगी ते सुख अक्षय ।। 5.21 ।।
ह्या श्लोकात सांगितले आहे परंतु लोक भगवंताच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांच्याकडून आपल्या प्रापंचिक अपेक्षा पूर्ण होतील अशी खात्री नसल्याने ते अपेक्षापूर्तीसाठी अन्य दैवतांची पूजा करू लागतात. भगवंत म्हणतात त्यांनी माझी भक्ती न करता, अन्य दैवतांची मनोभावे निरपेक्षतेने भक्ती केली तरी त्यांचा उद्धार होऊ शकतो पण विषयांना भुललेले लोक ही बाब लक्षातच घेत नाहीत. त्यामुळे ते तळहातावरील पाण्यात पोहोल्यासारखे करून त्यांच्या हिताचे नुकसान करुन घेतात.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, माझी समोर दिसणारी मूर्ती हेच माझे स्वरूप आहे असे निर्बुद्ध लोक समजतात आणि माझे अव्यक्त थोर रूप जे अंतिम आणि शाश्वत आहे त्याकडे डोळेझाक करतात.
व्यक्त मी हे चि ते घेती बुद्धि-हीन न जाणुनी । अव्यक्त थोर जे रूप माझे अंतिम शाश्वत ।। 24 ।।
मायेच्या मोहात गुंतलेले लोक समोर दिसणारे विश्व खरे आहे असे समजून चालणारे असतात आणि त्यातील घडामोडी आपल्या मनासारख्या व्हाव्यात म्हणून धडपडत असतात. त्यापायी सकाम भक्ती करतात आणि थोड्याशा फायद्यात सुख मानतात आणि त्यामुळे स्वत:चे कायमचे हित करून देणाऱ्या गोष्टीला मुकतात. माणसाची स्वार्थदृष्टी त्याचा कायमच घात करत असते ह्याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. जन्मोजन्मी मनुष्य हीच चूक करत असतो. ह्या मुद्यावर श्लोकाच्या विवरणात जोर देताना माऊली म्हणतात, कुठल्या का असेना पण देवाची भक्ती करायची त्यांना बुद्धी झालेली असल्याने ते अमृताच्या समुद्रात पोहत असतात. अर्थात पोहता पोहता त्या अमृताचे दोन थेंब जरी पोटात गेले तरी त्यांचा उद्धार होणार हे निश्चित असते पण हे लोक अशी सुसंधी चालून आलेली असताना त्यांचे तोंड दाबून धरतात कारण भक्ती करण्याचा त्यांचा उद्देश आपल्याला ईश्वराची प्राप्ती व्हावी असा नसून मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असा असतो. ते जरी अमृताच्या समुद्रात पोहत असले तरी त्यांना डबक्यातल्या पाण्याची म्हणजे नश्वर प्रपंचाचीच आठवण येत असल्याने ते अमृतात पोहत असूनही स्वत:च्या विनाशाची जुळणी करत असतात. लोक असं का करतात हेच समजत नाही. माणसाने स्वत:ला फळाच्या आशेच्या पिंजऱ्यात स्वत:हूनच कोंडून घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी प्रपंचात कितीही मिळालं तरी मनाचे समाधान होत नाही ह्याचा अनुभव घेतलेला असतो त्यावरून शहाणे होऊन, अनुभवाचे पंख पसरून, आशेच्या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडून भगवतस्वरूप होण्यासाठी झेप घ्यायला हवी.
क्रमश: