फिडिंग झोनसाठी शहरात जागांची निश्चिती
22 ठिकाणी कुत्र्यांना मिळणार अन्न : ‘पेटा“ व महापालिकेचा पुढाकार
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : भटक्या कुत्र्यांना ठरावीक वेळी एका निश्चित जागी अन्न मिळावे यासाठी महानगरपालिकेकडून फिडिंग झोन निर्माण केले जाणार आहेत. यासाठी शहरातील 58 प्रभागांपैकी 22 ठिकाणी जागांची पाहणी करून फिडिंग झोन निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत मंगळवार दि. 22 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पेटा“ संस्थेच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली असून त्यानंतर फिडिंग झोनवर शिक्कामोर्तब होणार आहे.
महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या शहर आणि उपनगरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. कुत्र्यांच्या प्रजननावर नियंत्रण मिळविण्यात महानगरपालिकेला पूर्णपणे अपयश आले आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जात असल्याचे सांगितले जात असले तरी गल्लीबोळात कुत्र्यांची पैदास वाढतच आहे. महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार शहरात 22 हजाराहून अधिक कुत्री आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या कळपाकडून दिवसेंदिवस नागरिकांवर हल्ले वाढत चालले आहेत. चालू वर्षाच्या सहा महिन्यात जिल्ह्यात रेबीजमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. रेबीजवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी भटक्या कुत्र्यांना अँटीरेबीज लस टोचण्यात आली आहे. पण ही मोहीम देखील निव्वळ फार्स ठरल्याचे दिसून येत आहे. काही जणांकडून कुत्र्यांना कोठेही अन्न टाकले जात आहे. मांसाहार टाकला जात असल्याने कुत्री आक्रमक बनत आहेत. एखाद्या वेळी अन्न न मिळाल्यास आक्रमक कुत्री नागरिकांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी भटक्या कुत्र्यांना कोठेही अन्न टाकू नये, असे महानगरपालिकेकडून वारंवार सांगितले जात असले तरीही त्याकडे दुर्लक्ष करत अन्न टाकले जात आहे.
सर्वोच्च न्यायालय आणि अॅनिमल बर्थ कंट्रोल (एबीसी) नियमावलीनुसार सार्वजनिक ठिकाणी होणारे वाद टाळण्यासाठी असे अधिकृत फिडिंग झोन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना किंवा लहान मुलांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून शाळा, रुग्णालये, इमारतींचे मुख्य दरवाजे किंवा खेळण्याच्या मैदानापासून दूर अशा जागा निश्चित केल्या जाणार आहेत. कुत्र्यांमधील आक्रमकता कमी करण्यासाठी फिडिंग झोन उभारले जाणार आहेत. कुत्र्यांना ठरावीक वेळी एकाच निश्चित जागी अन्न मिळाल्यामुळे ते अन्नासाठी इतरत्र भटकत नाहीत. किंवा आक्रमक होऊन कोणावरही धावून जात नाहीत.
फिडिंग झोनमध्ये कुत्र्यांना अन्न दिल्यानंतर ती जागा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्राधान्याने अन्न देणाऱ्या व्यक्तींची असते. सर्व भटकी कुत्री एकाच ठिकाणी जमा होणार असल्याने महानगरपालिकेला त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करणे सोपे होणार आहे. त्यामुळे भविष्यात कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवता येणार आहे. फिडिंग झोनसाठी प्राण्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘पेटा’ या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. फिडिंग झोनसाठी शहरात 22 ठिकाणी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.