पंचप्राणांची स्थाने आणि कार्य
बाप्पा म्हणाले, ईश्वरप्राप्ती करून घेणे हे साधकाचे एकमेव उद्दिष्ट असते आणि ते गाठण्यासाठी त्याला इतर कुणाची गरज नसल्याने इतरांचं अस्तित्व त्याच्यादृष्टीने गौण झालेलं असतं. त्यामुळे त्यांना कह्यात आणण्यासाठी त्याला षड्रिपुंची गरज लागत नसली तरी त्यांचा उपयोग तो ईश्वरप्राप्तीसाठी करून घेतो. सदैव सगळ्यांचं भलं व्हावं अशी इच्छा करतो. त्यासाठी निरपेक्षतेनं मनापासून प्रयत्न करतो. त्याच्या इच्छाआकांक्षा जरी संपल्या असल्या तरी त्याविषयीचे विचार कधीकधी त्याच्या मनात डोकावत असतात. त्या संपूर्ण नाहीशा व्हाव्यात म्हणून तो यम, नियमांचे पालन कसोशीने करत असतो. ध्यानधारणेत व्यत्यय येऊ नये म्हणून योगासने करून करून शरीर निरोगी व सुदृढ राखतो. योगासनाबरोबरच बाप्पा साधकाला प्राणायाम करायला सांगत आहेत. यामुळे मन स्थिर होते. ब्रह्मप्राप्ती साठी शारीरिक प्रयत्न म्हणून बाप्पा प्राणायामची शिफारस करतात. पुढील श्लोकात बाप्पा प्राणायामचे महत्त्व विशद करत आहेत.
प्राणायामं तु संरोधं प्राणापानसमुद्भवम् ।
वदन्ति मुनयस्तं च त्रिधाभूतं विपश्चित ।। 27।।
विवरण- वेदांनी सांगितल्याप्रमाणे प्राणशक्तीच्या आश्रयाने हे जीवन अखंड सुरु असते. ह्या प्राणाचे त्यांच्या त्यांच्या कार्यानुसार प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे पाच प्रकार पडतात. आपले शरीर पेशींचे बनलेले असते. शरीरातल्या प्रत्येक पेशीवर प्राणाचे पाचही प्रकार कार्य करत असतात. ह्या सर्व प्राणशक्ती प्रत्येक घटकात असल्या तरी त्यांचे कार्य विशेषकरून जेथे चालते त्यावरून त्यांची शरीरातील स्थाने आपल्या प्रत्ययास येत असतात. पंचप्राणांची स्थाने ह्याप्रमाणे सांगता येतील. हृदयापासून नाकाच्या शेंड्यापर्यंत प्राणाचे स्थान असते. मुखातून ग्रहण केलेल्या अन्नावर विविध प्रक्रिया होऊन त्यातील घटकांचे पचन करून शरीरास नको असलेला भाग मलविसर्जनातून बाहेर टाकण्यापर्यंत होणारा अन्नाचा प्रवास आवश्यक त्या गतीने करण्याचे काम अपानाकडून होत असते. म्हणून अन्नाशयाचा सर्व मार्ग हे अपानाचे स्थान होय. खाल्लेल्या अन्नाचे रुपांतर शरीरास आवश्यक असलेल्या रसादिकात करण्याचे काम अन्नाशय, यकृत, प्लीहा, स्वादुपिंड इत्यादि निरनिराळ्या अवयवांकडून करून घेणे तसेच हे रुपांतर होत असताना घडणाऱ्या क्रियेमुळे निर्माण होणारी उष्णता व तेज हृदयाखाली आणि नाभीच्या भोवती होत असल्याने हा सर्व प्रदेश हे समान वायूचे स्थान मानण्यात येते. अचानक शरीरात प्रवेश करणारी किंवा शरीरात उत्पन्न होणारी विजातीय द्रव्ये शिंक, खोकला, अश्रू इत्यादि रूपाने उदान बाहेर टाकत असतो. म्हणून घसा, नाक, कपाळ, डोळे इत्यादि प्रदेश उदानाचे स्थान होय. सर्व शरीरास व्यापून शरीरातील इंद्रियांची नियोजित कार्ये करून घेण्याचे काम व्यान करत असल्याने सर्व शरीरभर व्यानाचे स्थान असते. पंच प्राणांची शरीरातील स्थाने व त्यांचे कार्य लक्षात घेतले की, आपल्या शरीरात आकलन, मलविसर्जन, अन्नपचन, रक्ताभिसरण आणि मानसिक व बौद्धिक सुधारणा ही कार्ये चालूच असतात. प्राणायामने त्यांना स्वत:च्या अधिकारात आणले जाते. ह्या क्रियांवर प्राणायामच्या माध्यमातून ताबा मिळवला तर एकाग्रता साधणे सोपे जाते. साधकाची शारीरिक क्षमता वाढते. माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्न, पाणी आणि हवेची जरुरी असते. यापैकी अन्न व पाणी यांची निवड करताना मनुष्य चोखंदळ असतो पण हवेबाबत फारसा विचार न करता ते कार्य निर्सगावर सोडतो.
क्रमश: