गोवा बनावटीची दारू वाहतूकप्रकरणी दोघे ताब्यात
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची बांद्यात कारवाई
प्रतिनिधी
बांदा
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बांदा पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत गोवा बनावटीची दारू आणि दोन मोटारसायकली जप्त केल्या. ही कारवाई गुरुवारी रात्री विलवडे बांदा-ओटवणे मार्गावर करण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २ लाख ६ हजार रुपये आहे. याप्रकरणी निवेल बावतीस बारदेसकर (वय. ३९, रा. कडगांव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर),विठ्ठल गोविंद पाटील (वय. ३५, रा. कडगांव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर, सद्या रा. सोहाळे, ता. आजरा) अशी त्यांची नावे आहेत.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. विलवडे बांदा-ओटवणे मार्गावर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यात दोन आरोपींकडून गोवा बनावटीची अवैध दारू आणि दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.सदरची कारवाई सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड आणि पोलीस अंमलदार अमर कांडर यांच्या पथकाने केली. बांदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.