घरफोडी प्रकरणातील संशयिताच्या मुंबईतून आवळल्या मुसक्या
स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
मालवण/प्रतिनिधी
घरफोडी प्रकरणातील प्रसाद सुधाकर चव्हाण (25) मूळ रा. भरड, ता. मालवण , सध्या रा. राजेंद्रनगर, बोरिवली पूर्व, मुंबई या संशयिताला जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने सिद्धार्थनगर बोरिवली मुंबई येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे . २४ जुलै २०२५ रोजी रात्री झालेल्या एका घरफोडी प्रकरणात BNS 2023 चे कलम 305, 331(3),331(4) नुसार त्याच्यावर मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलहोता. सदर गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे करण्यात आला असून संशयितांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून आज मालवण पोलीस ठाण्यात त्याला हजर करण्यात आले. सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे,यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हेड कॉन्स्टेबल किरण देसाई, विल्सन डिसोझा, आशिष जामदार यांनी केलेली असून, सायबर पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे यांनी तांत्रिक मदत केलेली आहे.