लोन अॅप, ऑनलाईन गेम्सवर बंदीचा विचार
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात ऑनलाईन गेम्स आणि लोन अॅपवर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये ऑनलाईन गेमवर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटकात देखील यावर बंदी घालण्याचा विचार केला आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
मंगळूर जिल्हा पंचायत सभागृहात मंगळवारी झालेल्या प्रगती आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. ऑनलाईन गेमिंगमुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. फसवणूक करणाऱ्या अनेक ऑनलाईन गेम, लोन अॅपसंबंधी तक्रारी येत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सायबर गुह्यांना आळा घालण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. मंगळूरमध्ये जातीय सलोखा बिघडविणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात, याकरिता समुपदेशनही करा, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.
अडीच लाख पदांची भरती करणार!
राज्यात मागील काही वर्षांपासून सरकारच्या विविध खात्यांमध्ये भरती झालेली नाही. सरकारी शाळा आणि सरकारी रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे शिक्षक आणि डॉक्टरसह विविध अडीच लाख पदांची टप्प्याटप्प्याने भरती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.