For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लालकृष्ण अडवाणी ‘भारतरत्न’

07:30 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
लालकृष्ण अडवाणी ‘भारतरत्न’
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा : देदिप्यमान कार्याचा यथोचित गौरव झाल्याची भावना

Advertisement

सन्मान...

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून केले अभिनंदन
  • वाजपेयी-देशमुख यांच्यानंतरचे तिसरे भाजप नेते
  • राजकीय नेत्यांसह विविध स्तरातून कौतुक वर्षाव

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारने शनिवारी त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर फोटो शेअर करून या निर्णयाची माहिती दिली. या घोषणेनंतर भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. तसेच कुटुंबीयांनीही समाधान व्यक्त केले असून त्यांच्या कन्येने औक्षण करत आणि पेढा भरवून आनंदक्षण साजरा केला. यानंतर ‘हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण’ असल्याचे लालकृष्ण अडवाणी यांनी या सन्मानावर सांगितले.

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना 2015 मध्ये पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला होता. आता भारतरत्न देऊन सन्मानित केल्याबद्दल 96 वषीय अडवाणी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानले. तसेच त्यांनी परखड प्रतिक्रियाही दिली आहे. “मला घोषित झालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराचा अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकार करतो. हा केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठी सन्मान नाही, तर मी माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या क्षमतेनुसार सेवा केलेल्या आदर्श आणि तत्त्वांचाही सन्मान आहे.’ असे अडवाणी म्हणाले. यासंबंधीचे निवेदन त्यांच्यावतीने जारी करण्यात आले आहे.

हात उंचावत देशवासियांना अभिवादन

सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी नावाची घोषणा झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी देशवासियांना हात उंचावत अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी प्रतिभा अडवाणीही उपस्थित होती. लालकृष्ण अडवाणी यांची कन्या प्रतिभा हिने त्यांना मिठाई खाऊ घालून त्यांचे तोंड गोड केले आणि मिठी मारून त्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांच्या भावना

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावना व्यक्त केल्या. आमच्या काळातील सर्वात आदरणीय नेत्यांपैकी एक असलेले अडवाणी यांनी भारताच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. तळागाळात काम करून त्यांनी आयुष्याची सुऊवात केली आणि उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली. अडवाणींना भारतरत्नने सन्मानित करणे हा ‘माझ्यासाठी खूप भावनिक क्षण’ असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. अडवाणींनी सार्वजनिक जीवनातील त्यांच्या दशकांच्या सेवेत पारदर्शकता आणि सचोटीची अटल बांधिलकी दर्शविली आणि राजकीय नैतिकतेमध्ये एक अनुकरणीय मानक स्थापित केले, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

विविध नेत्यांकडून ‘शुभ’चिंतन

‘भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, मनोहरलाल खट्टर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी हा आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्या पोस्टमध्ये राजकारणातील पवित्रता, समर्पण आणि दृढनिश्चय यांचे ते प्रतीक आहेत. अडवाणीजींनी त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात विविध भूमिकांमधून देशाच्या विकासात आणि राष्ट्र उभारणीत दिलेले महत्त्वपूर्ण योगदान अविस्मरणीय आणि प्रेरणादायी असल्याचे नमूद केले आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवर्य लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा अत्यंत आनंददायी असल्याचे म्हटले आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या पुनर्रचनेत अडवाणींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अडवाणी हे राजकारणातील शुद्धतेचे जिवंत उदाहरण आहे. अडवाणींच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जन्म पाकिस्तानात, कर्तृत्व भारतात!

लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म पाकिस्तानातील कराची येथे 8 नोव्हेंबर 1927 रोजी एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला. अडवाणी यांचे प्रारंभिक शिक्षण सेंट पॅट्रिक हायस्कूल, कराची येथून झाले. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर अडवाणींचे कुटुंब पाकिस्तान सोडून भारतात आले. ते 1998 ते 2004 दरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत गृहमंत्री होते. त्यांनी 2002 ते 2004 दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये भारताचे सातवे उपपंतप्रधानपद भूषवले होते. तसेच दहाव्या आणि चौदाव्या लोकसभेच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका चोख बजावली आहे.

भारतरत्न : देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 2 जानेवारी 1954 रोजी या सन्मानाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून हा सन्मान कोणत्याही क्षेत्रातील सर्वोच्च योगदानासाठी दिला जातो. देशाचे पंतप्रधान या पुरस्कारासंबंधीची शिफारस राष्ट्रपतींकडे करतात. एका वर्षात जास्तीत जास्त 3 जणांना पुरस्कार देण्याची तरतूद आहे. सन्मानित व्यक्तीला राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेले सनद (प्रमाणपत्र) आणि पिंपळ पानाच्या आकाराचे पदक दिले जाते.

इदं न मम... हे जीवन माझे नाही...

हे जीवन माझे नाही. माझे जीवन माझ्या राष्ट्राला समर्पित आहे. ज्या दोन व्यक्तींसोबत मला जवळून काम करण्याचा मान मिळाला त्या  पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी यांचे आज मी कृतज्ञतेने स्मरण करतो. माझ्या सार्वजनिक जीवनातील माझ्या संपूर्ण प्रवासात ज्यांच्यासोबत मला काम करण्याचे सौभाग्य मिळाले त्या माझ्या पक्षातील लाखो कार्यकर्त्यांचे, स्वयंसेवकांचे आणि इतरांचे मी मनापासून आभार मानतो. मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना, विशेषत: माझ्या प्रिय दिवंगत पत्नी कमला यांच्याबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो. ते माझ्या आयुष्यातील शक्ती आणि उदरनिर्वाहाचे सर्वात मोठे स्त्राsत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मी मनापासून आभार मानतो. मला हा सन्मान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार. आपला श्रेष्ठ देश महानतेच्या आणि वैभवाच्या शिखरावर पोहोचू दे. जय हिंद!

(‘भारतरत्न’ म्हणून निवड झाल्यावर अडवाणी यांनी व्यक्त केलेल्या भावना.)

Advertisement
Tags :

.