लिव्हिंगस्टोनच्या 47 चेंडूत 87 धावा, इंग्लंडची मालिकेत बरोबरी
दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडचा विजय : मॅथ्यू शॉर्टच्या 5 बळी नंतरही ऑस्ट्रेलियाचा पराभव
वृत्तसंस्था/ कार्डिफ
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कांगारुंचा 3 गडी राखून पराभव केला. या विजयासह यजमानांनी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 6 बाद 193 धावा केल्या. यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनच्या धमाकेदारी खेळीच्या जोरावर इंग्लंडने विजयी लक्ष्य 19 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. फिरकीपटू मॅथ्यू शॉर्ट (22 धावांत 5 बळी) शानदार कामगिरीनंतरही ऑस्ट्रेलियाला सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. आता, उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 15 रोजी मँचेस्टर येथे होईल.
मिचेल मार्शला दुसऱ्या टी 20 मधून वगळल्यानंतर ट्रेव्हिस हेडने ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले. प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर पाहुण्या संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 193 धावा केल्या. मार्शच्या जागी संघात आलेल्या जेक फ्रेझर-मॅकगर्कने पहिले टी 20 अर्धशतक झळकावले. त्याने 31 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. त्याच्याशिवाय जोस इंग्लिसने 42 आणि कर्णधार हेडने 14 चेंडूत 31 धावा केल्या. सलामीवीर मॅथ्यू शॉर्टने 28 धावांचे योगदान दिले. अॅरॉन हार्डी 20 तर ग्रीन 13 धावांवर नाबाद राहिला.
लिव्हिंगस्टोनची धमाकेदार खेळी
मोठ्या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लिसने संघाची सुरुवात चांगली झाली. सॉल्ट व विल जॅक जोडीने 34 धावांची सलामी दिली. चौथ्या षटकात विल जॅक आणि जॉर्डन कॉक्स बाद झाल्यानंतर कर्णधार फिलिप सॉल्टने (39) लियाम लिव्हिंगस्टोनसह डावाची धुरा सांभाळली. सॉल्ट आऊट झाल्यानंतर बॅटिंगला आलेल्या जेकब बेथेलने आपल्या दुसऱ्या टी20 मध्ये धमाकेदार खेळी केली. बेथेलने लिव्हिंगस्टोनला पूर्ण साथ दिली. त्याने 24 चेंडूत 44 धावा केल्या. बेथेल बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील इंग्लिश फलंदाज झटपट बाद झाले, मात्र दमदार फॉर्ममध्ये असलेल्या लिव्हिंगस्टोनने 47 चेंडूत 6 चौकार व 5 षटकारासह 87 धावांची शानदार खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला.
मॅथ्यू शॉर्टचे 5 बळी
दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना गमावला असला तरी सलामीवीर मॅथ्यू शॉर्टने गोलंदाजीत नवा विक्रम रचला. मॅथ्यू शॉर्ट ऑस्ट्रेलियासाठी गोलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याने 22 धावा देत इंग्लंडच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यासह या सलामीवीराने ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच गोलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. विशेष म्हणजे, शॉर्टने केवळ 3 षटके टाकली आणि 5 फलंदाजांना केवळ 22 धावा देत बाद केले.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 6 बाद 193 (मॅथ्यू शॉर्ट 28, हेड 31, मॅकगर्क 50, इंग्लिस 42, बायडेन व लिव्हिंगस्टोन प्रत्येकी 2 बळी)
इंग्लंड 19 षटकांत 7 बाद 194 (फिल सॉल्ट 39, लिव्हिंगस्टोन 87, बेथेल 44, शॉर्ट 5 बळी, सीन अॅबॉट 2 बळी).