टी-20 अष्टपैलूंमध्ये लिव्हिंगस्टोनची अग्रस्थानी झेप
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने जाहीर केलेल्या टी-20 प्रकारातील मानांकनात इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनला अष्टपैलूंच्या यादीत पहिले स्थान मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात झालेल्या टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी केल्यामुळे लिव्हिंगस्टोनला मानांकनात बढती मिळण्यासाठी फायदा झाला. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने 87 धावा जमविल्या आणि 16 धावांत 2 बळी मिळविले. त्याआधी पहिल्या सामन्यात त्याने 32 धावांत 3 बळी व 37 धावांचे योगदान दिले होते. मात्र हा सामना इंग्लंडने गमविला होता. या कामगिरीमुळे लिव्हिंगस्टोनने एकदम सात स्थानांची प्रगती करीत अग्रस्थानावर झेप घेतली. त्याचे 253 रेटिंग गुण झाले असून आजवरचे त्याचे सर्वोच्च रेटिंग गुण आहेत. जवळचा प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोइनिसपेक्षा (211) तो 42 गुणांनी पुढे आहे. या क्रमवारीत झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (208) व बांगलादेशचा शकील अल हसन (206) तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत.
फलंदाजांच्या क्रमवारीत लिव्हिंगस्टोनने 17 स्थानांची झेप घेत 33 वे स्थान मिळविले. पण ऑस्ट्रेलियाच्या जोस इंग्लिसनेही मोठी झेप घेत टॉप टेनमध्ये स्थान मिळविले. त्याने दोन सामन्यात 37 व 42 धावा जमविल्या. ट्रॅव्हिस हेडने फलंदाजीतील अग्रस्थान कायम राखताना 31 व 59 धावा फटकावल्या. गोलंदाजांत अॅडम झाम्पाने अॅन्रिच नॉर्खियाला मागे टाकल्यामुळे क्रमवारीत पहिल्या सहामध्ये स्पिनर्सनीच स्थान मिळविले आहे. झाम्पा 662 गुणांसह सहाव्या, लंकेचा वानिंदू हसरंगा पाचव्या स्थानावर आहे तर इंग्लंडच्या आदिल रशीदने 721 गुणांसह अग्रस्थान कायम राखले आहे.