डोक्यात ‘मृत्यू’ ठेवून जिवंत
चीन या देशाच्या ‘हबेई’ या प्रांतातली ही अद्भूत घटना आहे. या प्रांतातील झांगझियाको येथे वास्तव्यास असणारा वांग तियानकिंग नामक व्यक्तीला डोक्यात काही प्रमाणात वेदना होऊ लागल्याने तो डॉक्टरांकडे गेला. चिकित्सा करुन त्याला औषधे देण्यात आली. तथापि, त्याच्या वेदना थांबेनात. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला ‘सीटीस्कॅन’ करुन घेण्याची सूचना केली. सिटीस्कॅनचा अहवाल पाहून डॉक्टर्सही अक्षर: हबकून गेले. कारण त्याच्या डोक्याच्या उजव्या भागात बंदुकीची एक गोळी अडकल्याचे आढळून आले. मग धावपळीला प्रारंभ झाला. बंदुकीची गोळी डोक्यात अडकली कशी आणि ती अडकूनही हा तिनकियांग इतके दिवस जिवंत राहिला असा, या प्रश्नांची उत्तरे डॉक्टर्सनाही लवकर सापडत नव्हती. जणू हा व्यक्ती मृत्यू त्याच्या डोक्यात ठेवून वावरत होता, असे सिटीस्कॅनमध्ये स्पष्ट झालेले होते. त्याच्या डोकेदुखीचे कारण समजल्यानंतर त्याच्या शस्त्रक्रियेची सज्जता करण्यास प्रारंभ झाला. डॉक्टरांनी वांग तिनकियांग याचा इतिहास पाहण्यासही प्रारंभ केला.
विचारपूस करताना अशी माहिती समोर आली, की त्याच्या डोक्यात ही वस्तू 1988 मध्येच अडकली होती. त्यावेळी तो फिरावयास गेला असताना एक वस्तू अतिशय वेगाने त्याच्या डोक्यात घुसली. कोणीतही गलोलीतून दगड भिरकावला असेल, असे त्याला वाटले. त्यावेळी फारशा वेदना जाणवल्या नाहीत. त्यामुळे त्याने या घटनेकडे त्याने दुर्लक्ष केले. जखम अगदीच लहान होती आणि रक्तस्त्रावही झाला नव्हता. त्यामुळे पुढे काही दिवसांमध्येच तो ही घटना विसरुनही गेला होता. मात्र, तो ज्याला दगड समजत होता, ती बंदुकीची गोळी होती आणि ती त्याची कवटी भेदून आत जाऊन अडकली होती. मात्र, सुदैवाने ती नाजूक भागात शिरली नव्हती. अन्यथा, त्याचा मृत्यू त्याच क्षणी झाला असता. गोळी एका कोपऱ्यात होती. तथापि, 2011 मध्ये त्याला प्रथम मोठ्या वेदना जाणवू लागल्या. त्यावेळी सिटीस्कॅन करण्यात आले आणि हा धक्कादायक घटनाक्रम समोर आला. 23 वर्षे या गोळीचा काहीच परिणाम कसा जाणवला नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
वांग तिनकियांग यांच्यावर नंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. ती अनेक तास चालली. मात्र, यशस्वी ठरली आणि त्याचा जीव वाचला. आज त्याची प्रकृती ठणठणीत तर आहेच. तसेच त्याचे नाव वैद्यकीय इतिहासात एक अद्भूत रुग्ण म्हणून नोंदले गेले आहे. अशा घटना अत्यंत दुर्मिळ असतात. सहसा बंदुकीची गोळी डोक्यात घुसल्यानंतर गंभीर परिस्थिती निर्माण होते. तथापि, हा रुग्ण अतिशय सुदैवी म्हणावयास हवा, असे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्यांचे मत आहे.