‘टॉयलेट’मध्ये वास्तव्य
सध्या जगभरातील शहरांमध्ये जागेची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खुराड्यासारख्या जागांमध्ये सुद्धा अनेक कुटुंबांना रहावे लागते. अशा जागांमध्ये योग्य प्रकारच्या सुविधाही नसतात. पण लोकांना रोजगारासाठी अशा जागा पत्कराव्या लागतात. केवळ भारतातच नव्हे, तर चीनसारख्या प्रगत देशातही अशीच परिस्थिती आहे. येथील एक युवती चक्क एका टॉयलेटमध्ये राहते. तिचे नाव यांग असे असून ती फर्निचर बनविणाऱ्या कारखान्यात काम करत आहे.
या कारखान्यात एक अशी खोली आहे, की जिचा उपयोग दिवसा टॉयलेट म्हणून केला जातो. तर रात्री तो या युवतीचे घर बनतो. आश्चर्य म्हणजे, तिने स्वत:हून रात्रीच्या निवासासाठी या जागेची निवड केली आहे. या कारखान्याचा मालकही अशाच छोट्या जागेत कारखान्यातच राहतो. प्रथम ती आपल्या मालकाच्या घरात रात्रीचे वास्तव्य करीत असे. तथापि, तिथे जागा कमी पडू लागली आणि गैरसोयही मोठ्या प्रमाणात होऊ लागली. त्यामुळे तिने तुलनेने मोठ्या असलेल्या टॉयलेटची निवड केली. मालकानेही तिला या स्थानी रात्री राहण्याची अनुमती दिली आहे. रात्री कारखाना बंद असतो. त्यामुळे या टॉयलेटमध्ये कोणीही येत नाही. परिणामी, तो रिकामाच असतो. तेथे ही युवती रात्री वास्तव्यास असते. दिवसा ती याच कारखान्यात काम करते. त्यामुळे तिला राहण्यासाठी दिवसा कोणत्याही जागेची आवश्यकता नसते. प्रश्न केवळ रात्रीचाच असतो आणि तो या टॉयलेटने सोडविला आहे. मात्र, ही जागाही तिला विनामूल्य मिळालेली नाही. तिला या जागेचे भाडे द्यावेच लागते. चीन हा देश बाहेरुन बराच प्रगत वाटतो. अनेक संदर्भांमध्ये तो प्रगत आहे, हे खरेच आहे. पण त्याचे आतले वास्तव यांसारख्या घटनांवरुन स्पष्टपणे सर्वांसमोर येत आहे.