जगा आणि जगू द्या..! : गाझा संघर्षाला विराम...
नोबेल कमिटीने जरी ट्रम्पना यावर्षीचा शांततेचा पुरस्कार नाकारलेला असला, तरी या आततायी पद्धतीने विचार करणाऱ्या नेत्याने पुरोगामी, उदारमतवादी व डाव्या विचारसरणीच्या नॅरेटीवला शह देत एक अभूतपूर्व घटना गाझापट्टीत 13 ऑक्टोबरला घडवून आणली. इस्रायलचे हमासच्या काळकोठडीत असलेले वीसही जिवंत नागरिक 735 दिवसांच्या दिव्यातून मृत्यूला हुल देऊन सुखरुप घरी आले. ट्रम्प यांची अरब राष्ट्रांना.. खास करून टर्की, इजिप्त व कतार यांना हमासवर राजकीय दबाव आणण्यास भाग पाडण्याची खेळी यशस्वी झाली. अर्थात इस्रायलच्या सैन्याने गाझापट्टीत हमासचा केलेला विध्वंसही यासाठी फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत होता.
अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी घडवून आणलेल्या गाझापट्टीतील शस्त्रसंधीनंतर जी नाजूक परिस्थिती मध्य पूर्व विभागांत निर्माण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका नक्की काय असणार आहे, याकडे पूर्ण जगाचे लक्ष असणार आहे. इस्रायलचे बहुचर्चित व पूर्ण डाव्या विचारसरणीच्या टार्गेटवर असलेले पंतप्रधान नेतान्याहू यांनी गेल्या दोन वर्षांत या क्षेत्रातील सर्व सामरिक व राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. इराणची या क्षेत्रातील पकड जी हिजबुल्ला, हमास, हुती, आसाद इत्यादीमुळे अभेद्य वाटत होती, तिला नष्ट करीत इस्रायलने या पूर्ण प्रदेशाचे सामरिक समीकरण बदलून एका नव्या दिशेकडे वळवले आहे.
जर राष्ट्राचे नेतृत्व खंबीर व दूरदर्शी असेल, तर जरी पूर्ण जग विऊद्ध असले, तरी तुम्ही शेवटी आपल्या राष्ट्राचे हितरक्षण करण्यात यशस्वी होऊ शकता, याचे हे उत्तम उदाहरण आहे. शांततेच्या काळात सैन्य व्यवस्थेवर योग्य ते लक्ष दिले, तर सैन्याच्या क्षमतेवर हरलेला डाव पलटून जिंकता येतो, याचेही हे उत्तम उदाहरण आहे. 7
ऑक्टोबरचा हमासचा इस्रायलवरील हल्ला हा त्याचा अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणारा तर होताच, पण ही इराणची एक खूप मोठी खेळी होती. उत्तरेकडून हिजबुल्लाचे आक्रमण, वेस्ट बँकमधून पॅलेस्टाईन नागरिकांचा उठाव, गाझापट्टीतून क्षेपणास्त्रांचा भरमसाठ मारा, खुद्द इराणमधून इस्रायलवर लांब दूरीच्या क्षेपणास्त्रांचा मारा करून ज्यूंना एकाप्रकारे भूमध्य सागरात बुडवायचे मुस्लिम ब्रदरहूडचे स्वप्न साकार करण्याचा हा प्रयत्न होता. होऊ घातलेला इस्रायल व सौदी अरेबियातील अब्राहीमिक करार जो ट्रम्प यांचे स्वप्न आहे, त्याला मूठमाती देत मुस्लिम जगात आपले स्थान पक्के करण्यासाठी इराण ही फार महत्त्वाकांक्षी अशी खेळी खेळला होता. गाझापट्टीबरोबर इराणचे हे स्वप्न आज भग्न अवस्थेत आहे.
हिजबुल्लाच्या नसरल्लाला बैऊतच्या तळघरात, हमासच्या हनिएला तेहरानमधील सेफ हाऊसमध्ये, याहया सिनवारला राफामध्ये तो ईजिप्तमध्ये पळून जायच्या तयारीत असताना व येमेनच्या पंतप्रधानांना सन्नामध्ये ठार मारून ‘घरमें घुसके मारेंगे’ या प्रक्रियेची एक नवीन परिभाषा इस्रायलने सामरिक क्षेत्रात प्रचलित केली आहे.
भविष्यकाळामध्ये या पार्श्वभूमीवर या प्रदेशात खूप अस्थिरता असणार आहे. जरी जगाने बहुमताने पॅलेस्टाईन या राष्ट्राला तात्विक मान्यता दिली असली, तरी वास्तवात इस्रायल ही घटना नजीकच्या भविष्यात तरी होऊ देणार नाही. 2006 मधे गाझापट्टीतील सर्व ज्यूंना त्यांच्या कबरींसकट हलवून इस्रायलने गाझापट्टीतील नागरिकांना एक सुवर्णसंधी बहाल केली होती. त्यावेळच्या निवडणुकीत अतिरेकी हमासला निवडून आणून एका प्रकारे आपल्याच विनाशाची आत्मघातकी प्रक्रिया या नागरिकांनी सुरू केली होती. पुढील दोन दशकांत जगाने पाठवलेल्या अब्जावधी
डॉलर्सचा अपव्यय करीत हमासने जे दहशतवाद्यांचे भूमिगत विश्व निर्माण केले, त्याच्याकडेही या गाझापट्टीतील नागरिकांनी दुर्लक्ष करून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. जोपर्यंत नागरिकांच्या या धर्मांध विचारसरणीत बदल होत नाही, तोपर्यंत या भूभागात शांतता प्रस्थापित होणे जवळजवळ अशक्य आहे. एका अर्थाने हमास ही केवळ उग्रवादी संघटना नाही. ती एक मानसिकताही आहे. हमास व येमेनमधील हुथी या दोन्हीही संघटनांचे ध्येय इस्रायलचा संपूर्ण विनाश हे आहे आणि हिंसेचा वापर हा त्यांचा मार्ग आहे. अल कायदा, आयसीस, तालिबान अल शबाब इ. ही या मानसिकतेची निरनिराळी सोंगे आहेत.
इस्रायलचे नागरिकही त्यांच्या दुसऱ्या महायुद्धातील भीषण अनुभवानंतर व गेल्या सात-आठ दशकांतील अरबांबरोबरील व इस्लामिक जगाच्या अनुभवानंतर तितकेच जहाल मनोवृत्तीचे झाले आहेत. जरी युरोपने इस्रायलकडे पाठ फिरवली आहे, असे चित्र आज दिसत असले, तरी अमेरिका पूर्ण ताकदीनिशी इस्रायलच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.
पाश्चिमात्य राष्ट्रांमधील बहुसंख्य लोकमतही अव्यक्तपणे इस्रायलच्या बाजूने आहे. मध्य-पूर्व क्षेत्रातील शांततेच्या मार्गातील हा सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर हा लढा हा इस्लामविऊद्ध प्रथम ज्युडाईझम व नंतर पाश्चिमात्य सभ्यता अशा दिशेनेही जाऊ शकत होता. इस्रायलने युद्धभूमीवर जरी पुन्हा एकदा यश संपादन केले असले, तरी ज्याला नॅरेटीव वॉर म्हणतात.. त्या क्षेत्रातील युद्ध तो हरला आहे. पाश्चिमात्य देशांतील मीडिया, पुरोगामी विचारवंत, राज्यकर्ते व विद्यापीठांच्या सहकार्याने हमास व त्यांची बाजू या क्षेत्रात सरस ठरली आहे. आजकालच्या सोशल मीडियाच्या जगात लोकसंख्या हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पूर्ण इस्लामिक जगातील एकजुटीसमोर इस्रायल ही लढाई कधीच जिंकू शकत नाही. भारत व इस्रायल या दोन देशांच्या इतिहासात व वर्तमानात खूप आश्चर्यकारक साम्यही आहेत आणि फरकही आहेत. दोन्हीही देशांच्या ज्या पायाभूत सभ्यता आहेत, त्या खूप प्राचीन तर आहेतच. पण विश्वाच्या सांस्कृतिक, वैचारिक, वैज्ञानिक व तात्विक जगामध्ये दोन्हीही सभ्यतांनी अति मोलाची अशी भर घातली आहे. आज दोन्ही देश जे एका वर्षाच्या फरकाने आधुनिक राष्ट्र म्हणून निर्माण झाले, ते आसपासच्या राजकीय अस्थिरतेमध्ये लोकशाहीचे खूप मोठे आधारस्तंभ आहेत. भारत पूर्ण विश्वामध्ये असा एकच देश आहे की जिथे ज्यू लोकांना त्यांच्यावर पूर्ण जगात अन्याय होत असताना सन्मानाने निवारा दिला गेला.
आज दोन्हीही देशांत राजकीय पातळीवर अतिशय खोल व सलोख्याचे संबंध तर आहेतच. पण सामरिक क्षेत्र, तंत्रज्ञान, शेती, सायन्स इत्यादी क्षेत्रातही खूप घनिष्ठ पातळीवर देवाणघेवाण सुरू आहे. दोन्हीही देशांतील मीडिया पूर्णपणे स्वतंत्र तर आहेच. पण लोकशाही पद्धतीने अनेक वेळेस निवडून आलेले दोन्ही देशांतील पंतप्रधान त्यांचे खास टार्गेट आहेत. हे दोन्हीही देश धार्मिक भावनेने प्रेरित असलेल्या दशहतवादाबरोबर अनेक वर्षे संघर्ष करीत आहेत. अनेक लढायांमध्ये इस्रायल भारताच्या बाजूने भक्कमपणे उभारला आहे. ऑपरेशन सिंदुरमध्ये इस्रायलने दिलेली क्षेपणास्त्रs व ड्रोन मोठ्या प्रमाणात वापरली गेली. असे असले, तरी भारताचे मध्य पूर्व व आखाती देशांशी असलेले आर्थिक, सामाजिक, धार्मिक व राजकीय हितसंबंध लक्षात घेता भारताचे हित व धोरण या संघर्षाला आटोक्यात ठेवणारे आहे.
हेमंत भागवत
एअर मार्शल (निवृत्त)