लिटल स्कॉलर, हेरवाडकर स्कूल विजयी
बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात लिटल स्कॉलर स्कूलने ज्युनेदीया स्कूल कुडचीचा 38 धावानी तर एम. व्ही. हेरवाडकरने केएलएसचा 14 धावांनी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. राज पवार, अवनिश मालदकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. एसकेईच्या प्लॅटिनम ज्युबली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात लिटल स्कॉलरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्वगडी बाद 149 धावा केल्या. राज पवारने 5 चौकारांसह 48, अरुण लमानीने 2 चौकारांसह 30, स्वराजने 15 धावा केल्या. ज्युनेदीयातर्फे अतिफने 2, आकीब, मल्हार व नमन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ज्युनेदिया कुडची संघाने 20 षटकात 8 गडीबाद 111 धावा केल्या. आरीफ रोहिलेने 3 चौकारांसह 28, नुमानने 23 तर अयनने 13 धावा केल्या. लिटर स्कॉलरतर्फे विराट मठपतीने 3, झाकीरने 2 तर गणेशने 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडीबाद 108 धावा केल्या.श्रीपूर्ण कुलकर्णीने 2 चौकारांसह 15 तर अवनिशने 3 चौकारांसह 19 धावा केल्या. केएलएसतर्फे पार्थने 24 धावात 2, रितेश धामणेकरने 28 धावात 2, विजीतने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलएसने 20 षटकात 9 गडी बाद 94 धावा केल्या.अनय सांबरेकरने 2 चौकारांसह 26 तर रितेश धामणेकरने 2 चौकारांसह 10 धावा केल्या.हेरवाडकरतर्फे अवनिश मालदकरने 19 धावात 3, श्रीपूर्णने 13 धावात 2, श्रेयश व रचित यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.