For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साहित्य फुलले...किती रुजले?

11:03 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
साहित्य फुलले   किती रुजले
Advertisement

 ग्रामीण भागात साहित्य संमेलनांची मालिका : आत्मपरीक्षण करण्याची वेळ 

Advertisement

मनीषा सुभेदार /बेळगाव

प्रतिकुल परिस्थितीमध्ये माणसाला आपल्या अस्तित्वासाठी अधिक आक्रमक होऊन प्राणपणाने लढावे लागते. कर्नाटक सरकारच्या जोखडामध्ये अडकलेल्या सीमावासियांना मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आजही लढा द्यावा लागतो. आपली भाषा प्राणपणाने जपताना आज बेळगावमधील असंख्य संस्था धडपड करताना दिसतात आणि त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. परंतु या धडपडीतून नेमके काय साध्य होते याचेही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. बेळगावमध्ये मराठी भाषा, संस्कृती टिकून राहावी या हेतूने शहर पातळीबरोबरच ग्रामीण भागामध्ये सर्वप्रथम कडोली येथील ‘कडोली साहित्य संघाने’ साहित्य संमेलनाचे आयोजन केले. त्यानंतर हळुहळू बेळगावच्या आसपास असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये साहित्य संमेलनांची मालिकाच सुरू झाली. मंथनतर्फे शहरामध्ये महिला साहित्य संमेलन सुरू झाले आणि खऱ्या अर्थाने मराठीचा जागर सुरू झाला. या संमेलनाबरोबरच स्थानिक पातळीवर अनेक साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले. ही धडपड नोंद घेण्याजोगीच.

Advertisement

परंतु! हा सर्व खटाटोप मराठीचे अस्तित्व टिकविण्यासाठी असेल तर मराठी म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाची काही एक जबाबदारी आहे. प्रारंभीच्या काळात संमेलनांमधून अत्यंत वैचारिक आणि अर्थपूर्ण भाषणांची मेजवानी मिळत असे. अपवाद वगळता आजही ती परंपरा सुरू आहे. मात्र, अलीकडे एक उपचार म्हणून साहित्य संमेलन होत आहे का? हा प्रश्नही तपासायला हवा. संमेलनाचे आयोजन करणाऱ्या संस्थांनी वर्षभर मराठी भाषेसाठी विविध उपक्रम हाती घ्यायला हवेत. यातील महत्त्वाचे काम म्हणजे शुद्ध मराठी भाषा बोलण्याचे संस्कार होणे आवश्यक आहे. बोलीभाषा तितकीच आवश्यक आहे. भाषा व्यवहारात जितकी वापरली जाईल तितके तिचे आयुष्य वाढते. भाषेची सरमिसळ अलीकडे खटकतही नाही. तरीसुद्धा ती ती भाषा आपल्या सर्व सौंदर्यस्थळांसह आणि अचूक उच्चारणांसह व्यक्त झाली तर तिचे सौंदर्य अधिक खुलते. परंतु त्या त्या भाषेचा एक स्वतंत्र लहेजा असतो. त्याची सरमिसळ निश्चितपणे खटकते. पाणी, दृष्टिकोन, मंथन यांचे उच्चार व्यासपीठावरून चुकीचे होऊ लागले तर ते नक्कीच खटकते. न आणि ण यातला फरक लक्षात यायला हवा. संमेलनाध्यक्षांनी भाषण अथवा प्रबंध न वाचता उत्स्फूर्त बोलण्याची अपेक्षा आहे.

दुसरी गोष्ट संमेलनांमध्ये तरुणाईचा सहभाग कमी किंवा अभावानेच दिसतो. संमेलन गावामध्ये आहे याचीही अनेकांना कल्पना नसावी हे दुर्दैव होय. तरुणाईला प्रामुख्याने विद्यार्थीवर्गाला कला, संस्कृती, साहित्य यांच्या प्रांगणाकडे वळविण्याचे मोठे आव्हान आयोजकांसमोर आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे त्याच त्या पुस्तकांवर, त्याच त्याच व्यक्तींच्या जीवनावर पुन: पुन्हा चर्चा घडवून आणण्यापेक्षा आजच्या पिढीच्या जगण्याचे, त्यांच्यासमोर असणाऱ्या आव्हानांचे, कला संस्कृतीपासून त्यांची फारकत का होते आहे? असे प्रश्न मांडण्याची, त्यावर चर्चा घडण्याची गरज आहे. किंबहुना आता संमेलनांची सूत्रे विद्यार्थ्यांकडे सोपवून त्यांना संधी देत घडविणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी शाळा-महाविद्यालयांशी या संस्थांना जोडून घेता येतील. संमेलनांमध्ये पूर्वी पुस्तक विक्री होत असे, ती जवळजवळ थंडावली आहे. त्याचाही शोध घ्यायला हवा. ज्या गावांमध्ये संमेलन भरते, तेथील विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळविणे अपरिहार्य आहे.

संमेलनांचे ढिसाळ नियोजन हे संमेलनाला गालबोट लावते, यात वाद नाही. त्यामुळे सुटसुटीत आणि विचाराला दिशा देणारे संमेलन आयोजित करणे आवश्यक आहे. एकाच दिवशी सातत्याने भाषणांचा, परिसंवादांचा मारा श्रोत्यांच्या सहनशीलतेचाही अंत पाहतो. त्यामुळे एक तर भोजनापूर्वी किंवा भोजनानंतर अशी गर्दी पाहायला मिळते. रसिकांनी दिवसभर संमेलनांना हजेरी लावावी, असे लखलखीत विचारप्रवर्तक आणि निखळ मनोरंजन होण्याजोगे कार्यक्रम निवडणे महत्त्वाचे आहे. संमेलनांच्या प्रारंभीची औपचारिकता कमी करणे शक्य आहे. संमेलनांसाठी सरकारी अनुदान मिळत नाही. महाराष्ट्र सरकारचे अनुदानही अद्याप प्रतीक्षेत आहे. त्यामुळे लोकाश्रयावर संमेलने होत आहेत, हे 100 टक्के मान्य आहे. त्यामुळे देणगीदारांना मान द्यावा लागतो, हेसुद्धा ओघाने आलेच. तरीसुद्धा कार्यक्रम सुटसुटीत झाले तर प्रेक्षकांना कंटाळा येणार नाही. त्यामुळे एकदिवशीय संमेलनात नेमकी किती सत्रे घ्यावीत याचाही उहापोह व्हायला हवा.

संमेलन आयोजकांनी सातत्याने वाचन करायला हवे. आजच्या साहित्य आणि सामाजिक विश्वात नेमके काय चालले आहे? याचा विचार झाल्यास वक्त्यांची निवड करणे त्यांना सोपे जाईल. अनेकदा नाव मोठे आणि व्यासपीठावरून विचार मात्र थिटे, असेही चित्र पाहायला मिळाले आहे. कोणत्याही संमेलनामध्ये मुलाखत ठेवल्यास मुलाखतकर्त्याने अत्यंत सुटसुटीत किंबहुना एका वाक्यात प्रश्न करून वक्त्याला अधिक बोलण्यास वेळ द्यायला हवा. अशा वेळी आत्मस्तुतीचा धोका मुलाखतकर्त्याने टाळणे आवश्यकच आहे. तसेच प्रत्येक वक्त्याच्या भाषणातील मुद्द्यांची पुनरुक्ती करून सूत्रसंचालकांनी रटाळ सूत्रसंचालन टाळायला हवे. सांस्कृतिक कार्यक्रमांना निश्चितपणे मागणी आहे. पण ते तितकेच दर्जेदार असायला हवेत. परगावात असणाऱ्या कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांबद्दल आपण अनभिज्ञ असू तर स्थानिक कलाकारांना वाव देणे श्रेयस्कर. बेळगावमध्ये अनेक नाट्या संस्थांमध्ये तरुण कलाकार येत आहेत. त्यांना प्रशिक्षण देऊन सादरीकरणाची संधी देणे हे बेळगावमधल्या तमाम मराठी साहित्य संस्कृती संस्थांचे कर्तव्य आहे. सर्व संस्था आपल्या कुवतीनुसार काम करत आहेत. त्यांच्या परिश्रमाला सलाम. संमेलन आयोजित करणे, वक्ते ठरविणे, त्यांचे नियोजन करणे आणि अन्य तयारी हे सोपे काम नाही. तथापि, काही उणिवा निश्चितपणे टाळणे शक्य आहे. परंतु साहित्य संमेलनांचा हेतु समाजासह असा असेल तर समाजाचा सहभाग बौद्धिक आणि वैचारिक पातळीवरही वाढायला हवा. सर्वांच्या परिश्रमाबद्दल कृतज्ञता आहेच. परंतु संमेलने म्हणजे मिरविण्याचे, प्रसिद्धीचे माध्यम न होता वैचारिक घुसळणीचे व्यासपीठ ठरावे, इतकेच प्रांजळपणे नमूद करावेसे वाटते.

‘कार्यक्रमच कार्यक्रम चोहीकडे...

शहरामध्ये आज अनेक संस्था, संघटना कार्यरत आहेत. मात्र, सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या सर्व संस्थांच्या किमान दोन प्रतिनिधींची एक संघटना (औपचारिक) होणे आवश्यक आहे. ‘कार्यक्रमच कार्यक्रम चोहीकडे, रसिकांनी जावे कुणीकडे’ असा प्रश्न रसिकांसमोर कृपा करून ठेवू नका. रविवारी तीन संमेलने, रथयात्रा, नाट्याप्रयोग आणि अन्य कार्यक्रम यामुळे रसिकांची धावाधाव होते आणि कोणत्याच कार्यक्रमाचा मनसोक्त आस्वाद त्यांना घेता येत नाही. त्यामुळे मराठीचे जतन करणाऱ्या सर्वच संस्थांनी आता याबाबत गांभीर्याने विचार करून रसिकांना गृहीत धरणे थांबवायला हवे.

Advertisement
Tags :

.