For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीमाभागात साहित्य संमेलनांनी रुजविले मराठीपण!

11:10 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीमाभागात साहित्य संमेलनांनी रुजविले मराठीपण
Advertisement

पाचवे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन उत्साहात

Advertisement

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव यांच्यावतीने रविवारी पाचवे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. मराठा मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज संमेलननगरीत झालेल्या या संमेलनामध्ये विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन पार पडले.

दिमाखदार-लक्षवेधी ग्रंथदिंडी

Advertisement

गोवावेस येथील बसवेश्वर सर्कलपासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या या ग्रंथदिंडीमध्ये वेशभूषा केलेले कलाकार तसेच नागरिक सहभागी झाले होते. घोड्यावर विराजमान झालेले छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्तीरेखा उठावदार दिसत होती. त्याचबरोबर महिला मंडळांनी सादर केलेल्या भजनांनाही नागरिकांनी दाद दिली. माजी नगरसेवक पंढरी परब व विलास घाडी यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. मराठा मंदिर येथे मोठ्या रांगोळ्या घालून ग्रंथदिंडीचे थाटात स्वागत करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी महिला तसेच पुरुष यामुळे मराठमोळ्या वातावरणाची निर्मिती झाली होती.

संमेलननगरीचे उद्घाटन

छत्रपती शिवाजी महाराज संमेलननगरीचे उद्घाटन नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदालनाचे उद्घाटन उद्योजक रमेश पाटील यांच्या हस्ते झाले. दिग्दर्शक कै. नितीन देसाई सभागृहाचे उद्घाटन व्यापारी सुरेश रेडेकर यांच्या हस्ते झाले. पॉलिहैड्रॉन व्यासपीठाचे उद्घाटन कंत्राटदार शिवाजी अतवाडकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन बाळासाहेब काकतकर यांच्या हस्ते झाले. ज्ञानेश्वर प्रतिमेचे पूजन प्रकाश मरगाळे, राजमाता जिजाऊ प्रतिमेचे पूजन नागेश मुचंडी, शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन वाय. बी. चव्हाण, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन प्रमोद पाटील यांच्या हस्ते झाले. कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन उद्योजक युवराज हुलजी यांनी केले. रोपट्याला पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण व राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, साहित्यिक डॉ. कृष्णात खोत, युवराज हुलजी, अनिल पवार, शरद गोरे, गणेश राऊत यासह इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागताध्यक्ष शिवसंत संजय मोरे म्हणाले, सीमाभागात मराठीपण रुजविण्यामध्ये साहित्य संमेलनांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ग्रामीण भागासोबतच शहरांमध्येही दर्जेदार साहित्य संमेलने होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक करताना डी. बी. पाटील म्हणाले, पाच वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. दर्जेदार साहित्यिक बेळगावमध्ये येऊन सीमावासीयांचे प्रबोधन करत असल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाचे सूत्रसंचालन एल. पी. पाटील व गीता घाडी यांनी केले. यावेळी नेमिनाथ कंग्राळकर, नागेश तरळे, शिवाजी हंगिरगेकर, प्रा. आनंद मेणसे, राजेंद्र मुतगेकर, डॉ. महेश थोरवे, नागेश झंगरूचे, रणजित चौगुले, संजय गौंडाडकर, निलेश शिंदे, सूरज कणबरकर, संजय गुरव, अस्मिता गुरव, स्वप्नील जोगाणी, गणेश द•ाrकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

‘अखंड महाराष्ट्राचा लढा’ गीत प्रदर्शित

सीमावासियांच्या व्यथा मांडणाऱ्या ‘अखंड महाराष्ट्राचा लढा’ या गीताचा प्रदर्शन सोहळा संमेलनादरम्यान पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, अंकुश केसरकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचा सोहळा झाला. सीमाकवी रवींद्र पाटील यांनी लिहिलेले, संगीतकार शरद गोरे यांनी ध्वनिमुद्रित केलेले व पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या आवाजाने सीमावासियांमध्ये नवचेतना पसरविणाऱ्या गीताचा प्रकाशन सोहळा पार पडला. तुकाराम मेलगे-पाटील यांच्या हस्ते यू-ट्यूबवरून हे गाणे सर्वांना ऐकविण्यात आले.

बेळगावमधील कलाकारांचा सन्मान

‘सूर नवा ध्यास नवा’ या कलर्स मराठीवरील रिअॅलिटी शोमधून बेळगावचे नाव प्रत्येक मराठी घरापर्यंत पोहोचविलेल्या अंतरा कुलकर्णी व सागर चंदगडकर या दोन्ही गायकांचा सत्कार करण्यात आला. अंतरा कुलकर्णी हिने मराठी गाणे सादर करून मराठी रसिकांची वाहवा मिळविली. सागर चंदगडकर याने ‘माझ्या राजा रंऽऽऽ’ व ‘माझी मैना गावाकडं राहिली’ ही छक्कड सादर करून सीमावासियांची मने जिंकली. ज्येष्ठ सीमातपस्वी मधु कणबर्गी यांच्या सीमाप्रश्नासाठीच्या कार्याचे कौतुक म्हणून त्यांचाही सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर ‘शिवराज्याभिषेक’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

Advertisement
Tags :

.