कुडाळात साहित्यिक कार्यकर्ता मेळावा , कवी संमेलन उत्साहात
कुडाळ,प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्यिक, सांस्कृतिक राजधानी कुडाळ आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग ही शाखा उत्तम प्रकारे सिंधुदुर्गात साहित्यिक चळवळ पुढे नेत आहे. या जिल्ह्यात शंभरहून अधिक साहित्यिक, लेखक घडले आहेत. त्या सर्व लेखक, साहित्यिकांचे संमेलन जानेवारी महिन्यात घ्यावे. या संमेलनाची सर्व जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली जाईल. साहित्यिक कार्यकर्ता व कवी निर्माण करण्याचे काम अशा कार्यक्रमातून होत आहे हे कौतुकास्पद आहे असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई यांनी व्यक्त केले.कुडाळ येथील श्री संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग व शाखा कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय साहित्यिक कार्यकर्ता मेळावा व कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनाचे उद्घाटन श्री देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवी संमेलनाचे अध्यक्ष मालवणी कवी रुजारियो पिंटो , कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, कोमसाप प्रांत विभागाचे समन्वयक अनंत वैद्य, जिल्हा सचिव ॲड.संतोष सावंत,कुडाळ तालुकाध्यक्ष प्रा संतोष वालावलकर,सुरेश ठाकूर, दीपक पटेकर ,अभिमन्यू लोंढे,संदीप वालावलकर आधी उपस्थित होते. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदचे राजधानी पुरस्कार विजेते रुजारियो पिंटो , सुरेश ठाकूर, ना. बा रणसिंग, वैशाली पंडित,वृंदा कांबळी , संदीप वालावलकर आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के म्हणाले कोकण मराठी साहित्य परिषद संपूर्ण कोकण विभागात साहित्य चळवळ उत्तम प्रकारे पुढे येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाखा चांगले काम करत आहे. साहित्यिक कार्यकर्ता मेळावा व कवी संमेलनाच्या माध्यमातून नवोदित साहित्य घडवण्याचे काम आम्ही करत आहोत. लेखकांचे साहित्य संमेलन घेण्याचा विचार आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुडाळ तालुका अध्यक्ष संतोष वालावलकर यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा सहसचिव सुरेश पवार, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन स्नेहल फणसळकर तर आभार संदीप साळसकर यांनी मानले.