For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऐका आपल्या आरोग्याची हाक

06:46 AM Apr 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऐका आपल्या आरोग्याची हाक
Advertisement

7 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जीवनशैली जसजशी बदलत चालली तसतशी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे, ज्या आरोग्याने आपल्याला जीवन समृद्ध करण्याची ताकद दिली त्या आरोग्याची हाक ऐकायला नको का?

Advertisement

आजच्या धकाधकीच्या जीवनात आजार आणि रोगांचा प्रसार या गोष्टी अटळ आहेत. त्यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्याशी कायम तोंड द्यावे लागत आहे. देश गरीब असो किंवा श्रीमंत, सर्वत्र रुग्णालयात गर्दी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सायन्स डायरेक्टचा प्रसिद्ध झालेला एक अहवाल अत्यंत धक्कादायक असून, यानुसार जगातील 8.2 अब्ज लोकसंख्येत केवळ 4.3 टक्के लोकच पूर्ण निरोगी आहेत. या अहवालानुसार 95 टक्क्याहून अधिक लोकांना आरोग्याच्या समस्या आहेत, तर विविध आजारांनी ग्रस्त सरासरी 33 टक्के लोकांना पाच वेगवेगळ्या आजाराशी तोंड द्यावे लागत आहे. लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसिजचा 2013 मधील अभ्यासानुसार जगातील फक्त 4.3 टक्के लोकसंख्या अगदी निरोगी आहे.

निरोगी शरीर हे उत्तम जीवनशैलीचे लक्षण समजले जाते. शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे हे सर्वात महत्त्वाचे वरदान समजले जाते. खरे तर, प्रत्येकजण निरोगी आयुष्याचे स्वप्न बाळगतो. पण चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्यातल्या बहुतेकांची आयुष्यातली बरीच वर्षे विविध आजारांना सामोरे जाण्यातच व्यतीत होतात. त्यातही महागाईमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला आहे. अर्थातच आजारी पडणे हे सर्वसामान्यासाठी न परवडणारे आहे-म्हणजेच आजारी पडू नये यासाठी काळजी घेणे क्रमप्राप्त झाले आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे : ठझ्rानहूग्दह ग्s ंाttाr tप्aह म्ल्rाठ आजारी पडल्यावर औषधोपचारावर खर्च करण्यापेक्षा आजारीच पडू नये याची काळजी घेणे आवश्यक ठरत आहे.

Advertisement

अलीकडच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे, धावपळीच्या जगात, स्पर्धेच्या जगात स्वत:च्या शारीरिक मनस्वास्थ्यामुळे आपल्या आरोग्याकडे कुणालाही बघायला सवड नाही. जो तो धावत आहे. हे कुठेतरी थांबावे व आपल्या शरीराची हाक ऐकावी यासाठी योगसाधना, प्राणायामाचे धडे लोक जागोजागी गिरवताना दिसतात. लोक आपल्या सुदृढ प्रकृतीसाठी वेगवेगळे व्यायाम करतात. म्हणजेच एकूणच स्वत:च्या प्रकृतीबद्दल बरीचशी जागरूकता आलेली आहे असे म्हंटल्यास वावगे ठरू नये. अशा धावपळीच्या जगात जरा थांबून आपल्या शरीराची हाक..... आपल्या आरोग्याची आर्त हाक ऐकण्याचा तर हा दिवस नव्हे ना?

खरे तर आपल्याकडे आरोग्य तज्ञाला वा डॉक्टरांना देवानंतरचे स्थान देण्यात आले आहे. पण आरोग्यक्षेत्रातल्या या बदलत्या वास्तवामुळे प्रगत वैद्यकीय क्षेत्राकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन आदरपासून आता तिरस्कारापर्यंत जाऊन पोहचला आहे. उपचारविषयक आर्थिक बाबीवर होणारा बेबनाव हे यामागचे प्रमुख कारण मानले जाते. तसे पाहिले तर, 21 व्या शतकात इतर क्षेत्राप्रामाणेच वैद्यकीय क्षेत्रानीही प्रगतीचे महत्त्वाचे पल्ले गाठले आहेत. बायपास सर्जरी, किडणी रोपण, गुणसूत्र शस्त्रक्रिया अशा कधीकाळी अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आता शक्य झाल्या आहेत. तांत्रिक प्रगतीच्या बळावर खूपसे आजार आटोक्यात आले आहेत.  पण एकीकडे शरीर दुरुस्त होत असताना आणखी एक गोष्ट रुग्णांना जाणवू लागली आहे ती म्हणजे उपचारांच्या खर्चापायी कोलमडत जाणारी आर्थिक परिस्थिती.

आज आसपास पाहिले की असे दिसते की, सामान्य माणूस भविष्यातल्या एक ना अनेक गोष्टीची तरतूद करून ठेवतो. अपवाद असतो फक्त एका गोष्टीचा. आरोग्यविषयक उपचारासाठी अत्यावश्यक अशा आर्थिक तरतुदीचा. आजारी पडल्यानंतर खर्चासाठी लागणारे पैसे कुठून गोळा करायचे हा यक्ष प्रश्न वेळ पडेल तेव्हा पाहू म्हणून दुर्लक्षिला जातो. त्यामुळेच मग आजारपणाच्या खर्चाचे आकडे जेव्हा जेव्हा पुढे येतात तेव्हा धक्का बसण्याची वा कोलमडून जाण्याची वेळ अनेकांवर येते. भारतामध्ये काही वर्षांपूर्वी मेडिक्लेम ही योजना वैद्यकीय बिलांच्या पूर्ततेसाठी कार्यान्वित केली गेली. पण या योजनेला त्यावेळी काही कारणामुळे प्रतिसाद मिळाला नाही.

विविध विमा कंपन्यांच्या आरोग्य विमा योजना कार्यान्वित आहेत. त्यांची माहिती संबधित विमा कंपन्यांकडून मिळवून आरोग्य विमा उतरवणे हा आजचा सगळ्यात सुज्ञ निर्णय ठरू शकतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर रोज 1 रुपया भरल्यास म्हणजे 365 रुपयात एका व्यक्तीस एका वर्षासाठी 30 हजार रुपयांचा आरोग्य विमा मिळू शकतो. याचा अर्थ त्या व्यक्तीस 30 हजार रुपयांपर्यंतच्या उपचाराविषयी खर्चाची काळजी करत राहण्याचे कारणच उरत नाही.

-डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी

Advertisement
Tags :

.