महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावध ऐका...

06:28 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यंदाचा उन्हाळा हा नेहमीपेक्षा अधिक कडक राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज देशवासियांना आता प्रत्यक्षात अनुभवावयास मिळत आहे. साधारणपणे फेब्रुवारी ते मे हा कालावधी उन्हाळ्याचा मानला जातो. होळीनंतर खऱ्या अर्थाने उन्हाळा जाणवण्यास सुऊवात होते. मात्र, यावर्षी फेब्रुवारीपासूनच पारा चढू लागल्याचे चित्र पहायला मिळाले असून, पुढच्या दोन महिन्यात हा आलेख आणखी वर जाण्याची चिन्हे आहेत. स्वाभाविकच यंदाचा अभूतपूर्व उन्हाळा, तळ गाठू लागलेली धरणे, पाणीटंचाई, टँकरची वाढती संख्या, दुष्काळाचे गडद होणारे सावट यामुळे चिंतेचे ढग अधिक गडद होताना दिसतात. मागील वर्षी एल निनोचा प्रभाव वाढला, तेव्हाच खरे तर शंकेची पाल चुकचुकली, असे म्हणायला हरकत नाही. प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या गरम पाण्याच्या प्रवाहांना आपण ‘एल निनो’ असे म्हणतो. हे गरम पाण्याचे प्रवाह जगभरातील वातावरणावर मोठा प्रभाव टाकतात. याने समुद्राचे तापमान तर वाढतेच, पण मान्सून तसेच इतर देशातील हवामानावर विपरीत परिणाम होतो. एल निनो आणि कडक उन्हाळा किंवा दुष्काळ हे तर समीकरणच मानले जाते. 2023 हे वर्ष तर आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदविण्यात आले आहे. 2024 बाबतही त्यापेक्षा काही वेगळे होण्याची शक्यता संभवत नाही. याला एल निनोबरोबरच ‘हरितवायूंचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन’ हा प्रमुख घटक कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. या वर्षीचे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च हे तिन्ही महिने विक्रमी उष्णतामानाचे ठरले आहेत. आजची स्थिती पाहिली, तर सूर्य अक्षरश: आग ओकताना दिसतो. दुपारी उन्हाचा चटका व रात्रीही उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भामधील अनेक जिल्ह्यांतील तापमान हे 40 ते 42 वर पोहोचल्याचे आकडेवारी सांगते. बुलडाणा, अकोला, नांदेड यांसारख्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रही भाजून काढत आहे. आगामी काही दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटकसह गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा निर्माण होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हे पाहता या वर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांचा चांगलाच कस लागणार आहे. उन्हाळा जितका कडक, तितके बाष्पीभवन वेगवान, हा निसर्गाचा नियम होय. साहजिकच महाराष्ट्रासह देशभरातील जलाशयांमधील पाणीसाठा खालावू लागल्याचे पहायला मिळते. देशातील महत्त्वाच्या जलाशयांपैकी निम्म्या जलाशयांमध्ये 40 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याचे केंद्रीय जल आयोगाने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. यात दक्षिण भारतातील स्थिती तर अतिशय बिकट अशीच म्हणावी लागेल. कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळूरमध्ये तर पाणीबाणीसारखी स्थिती दिसून येते. महाराष्ट्रामधील तीन हजार छोट्या मोठ्या धरणांमध्ये मिळून सध्या केवळ 39 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी हाच साठा 53 टक्के इतका होता. हे पाहता स्थिती किती दाऊण आहे, हे ध्यानात येते. नागपूर व अमरावती विभागात 49 टक्के, छत्रपती संभाजनगरमध्ये 20 टक्के, नाशकात 39 टक्के, पुणे 39 टक्के, तर कोकण विभागात 51 टक्के इतका साठा असल्याचे आकडे समोर आले आहेत. आणखी कडक उन्हाळ्याचे दोन महिने बाकी आहेत. जूनमध्ये चांगला पाऊस होईल, याची कधीही गॅरंटी नसते. त्यामुळे इतक्या प्रदीर्घ टप्प्याकरिता पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान देशापुढे व राज्यापुढे असेल. मागच्या काही दिवसांपासून अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आजमितीला राज्यात 1 हजार 417 टँकर सुरू दिसतात. पुढच्या काही दिवसांत टँकरची संख्या आणखी वाढू शकते. हे पाहता उपलब्ध पाणी काटकसरीने कसे वापरता येईल, पाण्याची बचत कशा प्रकारे करता येईल, याबाबत तातडीने व गांभीर्याने पावले उचलणे क्रमप्राप्त ठरते. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, आता देशातील वातावरण तापायला सुऊवात झाली आहे. पुढचे दोन महिने हे महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह संपूर्ण देशासाठी प्रचंड धकाधकीचे असतील. निवडणुकीच्या या धबडग्यात पाणीटंचाई व संभाव्य दुष्काळाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक संभवते. मात्र, तसे झाले, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. खरे तर सध्याची स्थिती ही दुष्काळ सदृश अशीच म्हणावी लागेल. मात्र, त्याचे ऊपांतर तीव्र दुष्काळी स्थितीत होऊ नये, याकरिता प्रशासनाला अंग झटून मेहनत घ्यावी लागेल. तशी ते घेतील, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. दुसऱ्या बाजूला यंदाचा पावसाळा भारतासाठी आनंददायक राहणार असल्याचा अंदाज आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक को ऑपरेशन अर्थात अपेकने वर्तविला आहे. हे शुभवर्तमानच ठरावे. एल निनोची स्थिती लवकरच निवळणार असून, ला निनोची स्थिती तयार होईल. त्यामुळे यंदा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असे या हवामान केंद्राने म्हटले आहे. अद्याप भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर व्हायचा आहे. तोही पुढच्या काही दिवसांत जाहीर होईल. तथापि, तत्पूर्वीचा हा अंदाज दिलासादायक म्हणता येईल. मागच्या काही वर्षांपासून मान्सून सक्रिय होण्यास विलंब होत आहे. मान्सूनचे आगमन लांबल्याने शेती क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम होत असतात. हे बघता यंदा मान्सूनचे वेळापत्रक कसे राहणार, याबाबतही उत्सुकता असेल. बाकी काही असले, तरी या वर्षाचा सुऊवातीचा टप्पा तरी संबंध देशवासियांसाठी कसोटीचा असल्याचे दिसून येते. कमी पाऊसमान, अतिकडक उन्हाळा, पाण्याची गंभीर स्थिती यांसारख्या गोष्टीतून आता आपण धडा घेण्याची आवश्यकता आहे. हवामान हे कधीही स्थिर नसते. त्यात चढउतार वा लहरीपणा हा असतोच. फक्त ग्लोबल वॉर्मिंग वा तत्सम घटकांमुळे हा लहरीपणा अधिक वाढू लागलाय, असे आपण म्हणू शकतो. अर्थात ही सगळी आव्हाने लक्षात घेता पर्यावरणाकडे भविष्यात अधिकाधिक लक्ष देण्यासाठी आपण कटिबद्ध रहायला हवे. सावध ऐका..पुढील हाका...हा मंत्र आपण ध्यानात घेतला, तर पुढचे बरेच प्रश्न सुकर होतील.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article