सर्वाधिक क्रोधी लोकांच्या देशाची यादी
जगात वेगवेगळ्या देशांमध्ये राहत असलेल्या नागरिकांवरून अनेक प्रकारच्या याद्या समोर येत असतात. यात हॅप्पीनेस इंडेक्स, श्रीमंत देशांची यादी, गरीब देशांची यादी इत्यादीचा समावेश असतो. आता एक नवी यादी समोर आली असून ती संतापावर आधारित आहे. ही यादी गॅलपने तयार केली आहे. 2024 ग्लोबल इमोशन्स रिपोर्टनुसार लेबनॉन जगातील सर्वात क्रोधी देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. लेबनॉनमधील सुमारे 49 टक्के लोकसंख्येने संतापाची भावना व्यक्त केली आहे. हा आकडा देशात सुरू असलेल्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संकटांची गंभीरता दर्शवितो.
सद्यकाळात लेबनॉन इस्रायलसोबत संघर्ष करत आहे. यामुळे तेथील जनता प्रचंड निराश आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये लेबनॉन या देशात सुमारे 6 हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे देशात निर्माण झालेल्या विनाशकारी आर्थिक स्थितीने जनतेत व्यापक असंतोष निर्माण झाला आहे. सांप्रदायिक विभाजन आणि संघर्षाने समाजाला आणखी अस्थिर करून सोडले आहे.
या यादीत 48 टक्क्यांस तुर्किये दुसऱ्या स्थानावर आहे. तुर्किये अद्याप मागील वर्षातील भूकंप आणि आर्थिक संकटातून अद्याप सावरलेला नाही. तिसऱ्या क्रमांकावर आर्मेनिया आहे. आर्मेनिया हा देश नागार्नो-काराबाख संघर्ष आणि क्षेत्रीय अस्थिरतेमुळे त्रस्त आहे. याचबरोबर यादीत इराक, अफगाणिस्तान, जॉर्डन, माली आणि सिएरा लियोन देखील सामील आहे. परंतु या यादीत भारताचा कितवा क्रमांक याची माहिती उपलब्ध नाही.
लेबनॉनमध्ये संताप वाढण्याचे सर्वात मोठे कारण हिजबुल्लाहचा प्रभाव आहे. हिजबुल्लाहच्या सैन्य आणि राजकीय शक्तीमुळे शासन व्यवस्था कमकुवत झाली आहे. इस्रायलसोबत वाढत्या तणावामुळे लेबनॉनी लोकांमध्ये असुरक्षिता वाढली आहे. या कारणामुळे देशाला चालू वर्षात 6.6 टक्के आर्थिक घसरणीला तेंड द्यावे लागले आहे. कधीकाळी मध्यपूर्वेतील स्वीत्झर्लंड म्हणून ओळखला जाणारा लेबनॉन आता राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेचा प्रतीक ठरला आहे.