Solapur News | सोलापूर शिक्षण विभागाच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये तुमच्या मुलाची शाळा तर नाही ना?
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात विनामान्यता व परवानगीशिवाय सुरू असलेल्या शाळांविरोधात शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली असून सोलापूर जिल्ह्यातील १५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश तातडीने शासनमान्य शाळांमध्ये करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.
जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी ६ जून २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, संबंधित शाळांना कोणतीही वैध शासकीय मान्यता नसल्याचे निदर्शनास आले आहे. बारंबार नोटिसा व सूचना देऊनही काही संस्था विनापरवानगी शाळा चालवत असल्याने प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, शासनमान्यता नसलेल्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गातील प्रवेश, शैक्षणिक नोंदी,शिष्यवृत्ती तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविताना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची मान्यता तपासणे आवश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील सोलापूर महानगरपालिका क्षेत्र, दक्षिण सोलापूर, माढा आणि सांगोला तालुक्यातील एकूण १५ शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सोलापूर शहरातील नोबेल किड्स प्री-प्रायमरी स्कूल, व्हेस्टर्न स्टार अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, नारायण ई-टेक स्कूल, विवेकानंद मोनॅस्टरी इंटरनॅ शनल इंग्लिश मीडियम स्कूल, इंद्रा इस्लामिक स्कूल अँड मदरसा स्कूल, श्री हनुमान स्कूल, अवेन बुड्स इंग्लिश मिडियम स्कूल आणि ताहिरा इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांचा समावेश आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील फारूक इंग्लिश मीडियम स्कूल (बोरामणी) व नागेश्वर कन्या आश्रम स्कूल (केगाव), माढा तालुक्यातील मिमंसा इंग्लिश मिडियम स्कूल तसेच सांगोला तालुक्यातील हडपमा इंग्लिश मीडियम स्कूल, सांगोला गुरुकुल, वामनमामा विद्यालय आणि विश्वशांती गुरुकुल प्राथमिक व पूर्व प्राथमिक विद्यालय (मेडशिंगी) यांचाही यादीत समावेश आहे. शिक्षणाधिकायांनी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना अशा शाळांवर नियमित लक्ष ठेवण्याच्या तसेच आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पालकांनी तत्काळ योग्य निर्णय घेऊन मान्यताप्राप्त शाळांमध्ये प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.