गोवा बनावटीची सव्वा कोटींची दारू पकडली
उंब्रज :
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सातारा या कार्यालयाने 19 ऑगस्ट रोजी पुणे आशियाई महामार्गावर तासवडे टोलनाक्यावर सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत व गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई करून आरोपीच्या ताब्यातून 1 कोटी 22 लाख 76 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईत गोवा राज्य बनावट विदेशी मध्य रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की 180 मि.ली क्षमतेच्या 48960 बाटल्या (1020 बॉक्स), आयशर कंपनीचा सहाचाकी ट्रक जिचा क्र. एमएच-43-बोएक्स-9408 व जुना वापरता ओपो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आले या जप्ती मुद्देमालाची एकूण किंमत 1 कोटी 22 लाख 76 हजार 200 रुपये इतकी आहे.
यातील आरोपी आकाश चंद्रकांत घोटकुले (वय 29 वर्षे, रा. उसे ता. मावळ जि. पुणे) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई).90.103.108 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, आयुक्त डॉ. राजेश देशमुख, अंमलबजावणी व दक्षता महाराष्ट राज्य सह आयुक्त प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापुर विभाग विभागीय उप-आयुक्त कोल्हापूर विजय चिचांळकर यांच्या निर्देशानुसार, सातारा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक, सातारा येथील राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथकाचे निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजय पाटील, सहा. दुय्यम निरीक्षक पांडुरंग कुंभार, जवान राणी काळोखे, मनीष माने, विनोद बनसोडे, अरूण जाधव कारवाईत यांनी भाग घेतला. गुह्याचा पुढील तपास माधव चव्हाण, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा हे करीत आहेत.
जिल्ह्यामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारुची निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयास देण्यात यावी, असे आवाहन बाबासाहेब भुतकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांनी केले आहे.