कणकुंबीजवळ 47 लाखाची दारु जप्त
अबकारी खात्याची पुन्हा मोठी कारवाई
बेळगाव : खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथील अबकारी तपास नाक्याजवळ गोव्याहून येणाऱ्या एका आयशर कंटेनरची झडती घेतली असता गोवा बनावटीची तब्बल 46 लाख 96 हजार रुपयांची दारू आढळून आली. अबकारी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बेळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून सदर दारू व कंटेनर अबकारी पोलिसांनी जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी मध्यरात्री गोव्याहून कंटेनर क्रमांक जी जे 18, बी व्ही 7849 हा बेळगावकडे येत होता. यावेळी तेथील अबकारी पोलिसांनी वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये पोलिसांना संशय आला.
अबकारी अप्पर आयुक्त मंजुनाथ, अबकारी आयुक्त एफ. एच. चलवादी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वनजाक्षी एम., अबकारी अधीक्षक विजयकुमार हिरेमठ, अबकारी अधीक्षक जगदीश कुलकर्णी, अबकारी उपअधीक्षक रवी एम. मुरगोड, खानापूर विभागाचे अबकारी निरीक्षक मंजुनाथ मळ्ळीगेरी, कणकुंबी अबकारी पोलीस स्थानकाचे बाळगौडा पाटील, अबकारी उपनिरीक्षक मल्लन निलजकर, के. बी. कुरहट्टी, आप्पासाहेब कांबळे, एस. बी. शिवणगी यांनी ही कारवाई केली आहे. सदर दारू बॉक्सवर नॉट फॉर सेल इन गोवा असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नेण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दारू वाहतूक करण्यासाठी मोठी चलाखीही आली आहे. कंटेनरमध्ये आणखी एक बॉक्स तयार करून त्यामध्ये हा दारुसाठा ठेवण्यात आला होता. मात्र पोलिसांनी याचा तपास करून ही दारू जप्त केली आहे.