न्हयबाग- सातार्डा पुलावर पावणेतीन लाखांची दारू जप्त
महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनातील दारूचे बॉक्स जप्त; चालकास अटक
पेडणे (प्रतिनिधी)
पेडणे अबकारी खात्याने महाराष्ट्रात जाणारी बेकायदेशीर तीन लाख 78 हजार 900 ऊपयांची दारू आणि पंधरा लाख ऊपये किमतीचे वाहन जप्त केले. वाहनचालक ज्ञानेश्वर धर्मा उन्हाळे याला ताब्यात घेण्यात आले. न्हयबाग पोरस्कडे सातार्डा पुलावरील अबकारी खात्याच्या तपासणी नाक्यावर मंगळवारी दि. 28 रोजी रात्री उशिरा ही कारवाई केली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अबकारी खात्याचे अधिकारी नियमित पेट्रोलिंग आणि तपासणी करत असताना संबंधित वाहन संशयास्पदरीत्या आढळले. वाहनाची सखोल तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या मद्याचे बॉक्स आढळून आले. तत्काळ संपूर्ण माल जप्त करण्यात आला.
अबकारी विभागाच्या या धाडसी कारवाईमुळे गोवा-महाराष्ट्र सीमावर्ती भागातील अवैध मद्य वाहतुकाला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.