गीर जंगलात सिंहांचे वाढते मृत्यू
गेल्या पाच वर्षांपासून 555 आशियाई सिंहांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने हल्लीच लोकसभेत प्रश्नोत्तर आणि चर्चेच्यावेळी दिली. आज आशियाई सिंहाच्या प्रजातीसाठी गीरचे वनक्षेत्र नैसर्गिक अधिवास असून, सरकारी आकडेवारीनुसार 2013 साली सिंहाची 523 ही संख्या 2020 साली 674 झालेली असून, वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचे वाढते मृत्यू आज चिंतेचा मुद्दा ठरलेला आहे. 2019 साली 113, 2020 साली 124, 2021 साली 105, 2022 साली 110 आणि 2023 साली 103 आशियाई सिंहांचा मृत्यू झालेला आहे.
गुजरात राज्यातल्या पूर्वाश्रमीच्या जुनागढ संस्थानात येणारे गीरचे जंगल संपूर्ण जगात आशियाई सिंहांसाठी शेवटचा नैसर्गिक अधिवास ठरलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी जे असंख्य उपक्रम राबविले, त्याची फलनिष्पत्ती म्हणून त्यांची संख्या वाढत चालली आहे. परंतु असे असले तरी गीर जंगलातला नैसर्गिक अधिवास या वाढत्या संख्येसाठी प्रतिकुल ठरलेला असून, ताकदवान नर सिंहाशी होणारा जीवघेणा संघर्ष, अन्न-पाण्याच्या प्राप्तीसाठी सामोरे जावे लागणारे प्रश्न, मानवी समाजाकडून एकंदर त्यांच्या अधिवासावरती होणारी अतिक्रमणे आणि अक्षम्य हस्तक्षेप आणि तृणहारी जंगली श्वापदांची घटती संख्या आणि त्यामुळे पाळीव प्राण्यांवरती सिंहाकडून होणारे हल्ले यामुळे आज गीरचे जंगल आणि परिसर त्यांच्यासाठी प्रतिकुल होऊ लागले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून 555 आशियाई सिंहांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने हल्लीच लोकसभेत प्रश्नोत्तर आणि चर्चेच्यावेळी दिली. आज आशियाई सिंहाच्या प्रजातीसाठी गीरचे वनक्षेत्र नैसर्गिक अधिवास असून, सरकारी आकडेवारीनुसार 2013 साली सिंहाची 523 ही संख्या 2020 साली 674 झालेली असून, वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचे वाढते मृत्यू आज चिंतेचा मुद्दा ठरलेला आहे. 2019 साली 113, 2020 साली 124, 2021 साली 105, 2022 साली 110 आणि 2023 साली 103 आशियाई सिंहांचा मृत्यू झालेला आहे. वन्यजीव संशोधकांनी देशात गीरचे जंगल हा आशियाई सिंहांसाठी एकमेव नैसर्गिक अधिवास शिल्लक राहिल्याकारणाने आणि विषाणूजन्य साथीच्या रोगांमुळे सिंहासाठी गंभीर धोका असल्याने त्यांच्यासाठी मध्यप्रदेशातील कुनोच्या जंगलात नवीन अधिवासात त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव गुजरातमध्ये होणाऱ्या वाढत्या विरोधामुळे पुढे जाऊ शकलेला नाही. गीरच्या जंगलाची आशियाई सिंह शान असली तरी साथीच्या रोगामुळे त्यांच्या जीवाला सातत्याने धोका असून, या संकटाला सामोरे जाण्यासाठी कोणताच ठोस कृती आराखडा उपलब्ध नाही आणि त्यामुळे 2013 साली सर्वोच्च न्यायालयाने सिंहांचे स्थलांतरण आणि पुनर्वसन कुनोच्या जंगलात करावे, असा निर्णय दिला होता. भारतीय वन्यजीव संस्था डेहराडूनच्या अहवालानुसार सरकारी यंत्रणा 40 सिंहाचे स्थलांतर आणि पुनर्वसन गीर राष्ट्रीय उद्यानापासून 100 कि.मी.च्या अंतरावर असणाऱ्या बारदा अभयारण्यात करण्याच्या विचारात आहे. परंतु सरकारचा हा पर्याय आशियाई सिंहाच्या एकंदर अस्तित्व आणि अभिवृद्धीसाठी फलदायी ठरेल की नाही, याबाबत वन्यजीव संशोधक साशंक असून त्यांनी भौगोलिकरित्या गीरच्या जंगलापासून दूर असलेले कुनोचे जंगल अधिक पोषक असल्याचे प्रतिपादन केलेले आहे.
भारतातल्या गीरच्या जंगलात वास्तव्यास असलेला सिंह ताकदवान प्राणी म्हणून समस्त वन्यजीव विश्वात जरी ओळखला जात असला तरी सप्टेंबर 2018 मध्ये पिसवांहून लहान असणाऱ्या विषाणूंच्या हल्ल्यापुढे हतबल होऊन 19 दिवसांत गीरच्या जंगलातील 23 सिंहांनी प्राण सोडले होते. विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे एकूण 34 सिंह मृत्यूमुखी पडल्याची बाब प्रकाशात आली होती. गीरचा अधिवास आज सिंहाच्या वाढत्या संख्येला अपुरा पडत असल्याची बाब 2015 च्या गणनेत समोर येऊन सरासरी तीनपैकी एक सिंह गीरच्या बाहेर वास्तव्य करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे वन्यजीव संशोधकांनी आशियाई सिंहाच्या दूरगामी संरक्षण आणि संवर्धनासाठी कुनोच्या वनक्षेत्राचा पर्याय स्वीकारण्याचा आग्रह धरलेला आहे. हल्लीच जागतिक वन्यजीव दिनानिमित्त राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या सातव्या बैठकीत गीर येथील सिंह सदनात मे 2025 मध्ये आशियाई सिंहाची सोळावी गणना घेणार असल्याचे सांगून, सरकारने सिंहाच्या संवर्धनासाठी 2900 कोटींहून जास्त निधी मंजूर केल्याचे स्पष्ट केले. आजच्या घडीस गुजरातमधील नऊ जिल्ह्यांमधल्या 53 तालुक्यात सुमारे 30 हजार किलोमीटर परिघात सिंहाचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झालेले आहे. 2020 सालच्या गणनेद्वारे गुजरातमध्ये 674 सिंह असल्याचे प्रकाशात आले परंतु 2024 साली केवळ एका वर्षाच्या कालखंडात धावत्या प्रवासी रेल्वेची धडक बसून सुमारे सात सिंहांचा मृत्यू झाल्याची बाब चर्चेला आली होती. गुजरात उच्च न्यायालयाने रेल्वेवरती वेगमर्यादा लादण्याचा निर्णय दिलेला आहे.
पूर्व गीर वन्यजीव विभागातील 90 कि.मी. लांबीच्या रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेलगाड्यांची वेगमर्यादा ताशी 40 कि.मी. करण्याबरोबर अन्य नियम व अटींचे पालन करण्याची शिफारस केलेली आहे. शेत्रुंजी वन्यजीव विभाग आणि अमरेली सामाजिक वनविभाग क्षेत्रातून धवणाऱ्या रेल्वेगाड्यांवर वेगवेगळे निर्बंध घातलेले आहेत. परंतु असे असले तरी गीरमधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती धावणाऱ्या अन्य वाहनांवरच्या एकंदर वेगमर्यादा आणि अन्य आवश्यक निर्बंधांकडे मात्र कानाडोळा केला जात आहे. त्याचप्रमाणे पशुपालक मालधारी जमात, सिद्धी आणि अन्य लोकसमूहाचे वास्तव्य गीर वन्यक्षेत्रात वाढत चाललेले असून, त्यामुळे सिंहांचे अस्तित्व संकटात सापडलेले आहे. गीर अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानाच्या 1412 चौ.कि.मी.च्या वनक्षेत्रात 300-325 सिंहांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
एकेकाळी आशिया, आफ्रिका आणि युरोपमध्ये सिंह आढळत होता. परंतु आज आफ्रिकेतील सिंहापेक्षा भारतातील गुजरात राज्यातील सिंह अधिक सुरक्षित असल्याचे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्थेने आपल्या अहवालात नमूद केलेले आहे. एकेकाळी जुनागढ संस्थानातील सिंहाची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने, त्यावेळचे नवाब महंमद रसुलखान यांनी त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना राबविल्या.
18 सप्टेंबर 1965 रोजी गुजरात सरकारने गीर अभयारण्य अधिसूचित केले. आज 1410.30 चौ.कि.मी. अभयारण्य तर 258.71 चौ.कि.मी. वनक्षेत्र राष्ट्रीय उद्यानाखाली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याने गीर येथील पानगळती युक्त वृक्षवेली सुरक्षित असल्याकारणाने गुजरात राज्यातील सौराष्ट्रातून वाहणाऱ्या सात नद्यांचे जलसंचय क्षेत्र सुरक्षित राहिलेले आणि चारशेहून ज्यादा वन्य प्राण्यांच्या नानाविध प्रजातींना संरक्षण लाभलेले आहे. आज पर्यावरणीय पर्यटनाच्या उपक्रमांर्तगत सिंह सफारीचे आयोजन करण्यात येत असून, त्याचेही दुष्परिणाम सिंहाच्या अधिवासावरती होऊ लागलेले आहेत, हे विसरता कामा नये. गीरचे सिंह केवळ गुजरातचेच नव्हे तर जगाची शान असल्याने त्यांचे रक्षण महत्त्वाचे आहे.
- राजेंद्र पां. केरकर