60 हजारांच्या युरियावर 40 हजारांचे 'लिंकिंग'
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
जिह्यात आरसीएफ, इफको, चंबळ, स्पीक, कृभको, महाधन आदी कंपन्यांकडून युरिया खताचा पुरवठा केला जातो. पण या कंपन्यांकडून युरिया खतावर लिंकिंगची मोठ्या प्रमाणात सक्ती केली जात आहे. सुमारे 60 हजार रुपये किंमतीचा 12 टन युरिया (एक ट्रक) घेतल्यास त्याच्यावर 40 हजार रुपये किंमतीचे लिंकिंगचे साहित्य (किटकनाशके, तननाशके, टॉनिक आदी) घेण्याची सक्ती आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत खत कंपन्यांकडून लिंकिंगच्या साहित्यासह पाठविलेला युरिया घेण्यास कृषी दुकानदारांनी नकार दिला. खत कंपन्यांच्या या मुजोरीविरोधात कृषी दुकानदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. या विरोधात मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे.
युरिया टंचाईबाबत ‘तरुण भारत संवाद’ च्या प्रस्तुत प्रतिनिधींनी अनेक कृषी दुकानदारांशी संपर्क साधून आपण युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध करून का ठेवत नाही? याबाबत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. यावेळी कृषी दुकानदारांनी त्यांच्या अनेक व्यथा मांडल्या. खत कंपन्यांकडून युरियासह लिंकिंगच्या अन्य साहित्याची खरेदीची अट घातली असून दुकानदारांना न सांगताच इतर संयुक्त खतांसह विविध औषधे दिली जात आहेत. लिंकिंगवरील औषधांना फारशी मागणी नसल्यामुळे भांडवल गुंतवून ठेवायचे कसे?, परिणामी युरियाच न घेतलेला बरा, अशी भूमिका दुकानदारांनी घेतली. यामुळे जिह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध असल्याचा कृषी विभागाकडून दावा केला जात असला तरी ऐन रब्बी हंगामातच युरिया ‘दुष्काळ’ असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाने वास्तव समजावून घेऊन कायमस्वरूपी उपाय शोधणे गरजेचे आहे.
- जिह्यात पुरेसा खत साठा, मग युरियासह अन्य खतांची टंचाई का ?
रासायनिक खतांची कोणतीही टंचाई नाही. शेतकऱ्यांना बांधावर खते मिळतील अशा घोषणा शासनासह जिह्यातील कृषि अधिकाऱ्यांनी अनेकदा केल्या आहेत. मग गेल्या दोन महिन्यांपासून युरियाची टंचाई का आहे ? 10:26:26 आणि डीएपी खतांसह अन्य संयुक्त खतांचा दुष्काळ का आहे ? असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. अनेक कृषि दुकानांमध्ये ‘चारशे रुपये देतो, पण युरिया द्या’ अशी अगतिकतेची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
- सूचना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच बेदखल
मंत्री आबिटकर यांनी कंपन्यांनी लिकिंगची सक्ती करू नये अशा सूचना कृषी विभागाचे अधिकारी, खात उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कृषी दुकानदारांसोबत 6 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत दिल्या. तरीही 7 जानेवारी रोजी खत कंपन्यांनी युरियासोबत लिंकिंगचे साहित्य पाठविले. पण कृषी दुकानदारांनी तो युरिया घेण्यास नकार दिला. त्यामुळे तुम्ही कितीही सूचना, आदेश द्या आम्ही त्याची पायमल्ली करून लिंकिंग करणारच असा अप्रत्यक्षरित्या संदेश खत कंपन्यांनी दिला आहे.
- लिंकिंगसह युरीया घेण्यास नकार
सर्वच कंपन्यांकडून 60 हजारांच्या युरिया खतासोबत सुमारे 40 हजारांचे लिकिंगचे साहित्य घेण्याची अट असल्यामुळे कृषी दुकानदारांकडून खरेदी करण्यास नकार दिला आहे. खत कंपन्यांकडून लिंकिंगचे साहित्य दिले जात नसल्याचे सांगितले जात असले तरी जिह्यातील सर्व कृषी दुकानदारांनी यादी तयार करून संघटनेच्या संबंधित तालुकाध्यक्षांकडे दिली आहे. याबाबत मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासोबत बैठक घेण्याचे नियोजन केले आहे.
विनोद पाटील, जिल्हाध्यक्ष, असो. ऑफ कोल्हापूर बि-बियाणे, किटकनाशके व खते व्यापारी संघटना