For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लिंगराज, भरतेश, आरपीडी, गोगटे, जैन, व्हीपीपी विजयी

10:45 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
लिंगराज  भरतेश  आरपीडी  गोगटे  जैन  व्हीपीपी विजयी
Advertisement

आयएमईआर चषक आंतरकॉलेज फुटबॉल स्पर्धा

Advertisement

बेळगाव : केएलएस आयएमईआर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आयोजित तिसऱ्या आयएमईआय चषक आंतरकॉलेज फुटबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी लिंगराज, भरतेश, आरपीडी, गोगटे, जैन बीसीए, वसंतराव पोतदार संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजयी सलामी दिली. जीआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोतिज या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आयएमईआर महाविद्यालयाचे संचालक डॉ. आरीफ शेख, क्रीडा निर्देशक जॉर्ज रॉड्रिग्ज, सुमंत देसाई, विजय रेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. आरीफ शेख यांनी चेंडू लाथाडून स्पर्धेचे उद्घाटन केले. पहिल्या सामन्यात लिंगराज संघाने एटीआयएम संघाचा 3-0 असा पराभव केला. लिंगराजतर्फे चंद्रू, शब्बीर व निवृत्ती यांनी प्रत्येकी 1 गोल केला. दुसऱ्या सामन्यात भरतेश होमिओपॅथीक संघाने भरतेश पॉलिटेक्निक संघाचा टायब्रेकमध्ये 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टायब्रेक नियमाचा वापर केला. त्यामध्ये भरतेशने विजय मिळविला.

तिसऱ्या सामन्यात आरपीडी संघाने आयएमईआर संघाचा टायब्रेकमध्ये 3-1 असा पराभव केला. निर्धारित वेळेत आरपीडीच्या प्रणीत पी. ने गोल केला तर आयएमईआरतर्फे आदित्य अंबोलीने गोल करुन 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर टायब्रेकमध्ये आरपीडीने विजय संपादन केला. चौथ्या सामन्यात गोगटे ब संघाने जीएसएस संघाचा अटीतटीच्या लढतीत 2-1 असा निसटता पराभव केला. या सामन्यात सामन्याच्या 17 व्या मिनिटाला गोगटेच्या ऋषिकेशच्या पासवर सुजलने पहिला गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 28 व्या मिनिटाला जीएसएसच्या ऑस्टिन डिसोझाने बरोबरीचा गोल करुन 1-1 अशी बरोबरी साधून सामन्यात रंगत निर्माण केली. दुसऱ्या सत्रात 38 व्या मिनिटात सुजलच्या पासवर ऋषिकेशने दुसरा गोल करुन 2-1 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.

Advertisement

पाचव्या सामन्यात जैन बीसीए संघाने जैन पॉलिटेक्निक संघाचा 2-1 असा निसटता पराभव केला. या सामन्यात 17 व्या मिनिटाला जैन बीसीएच्या ओमकारच्या पासवर रोहितने पहिला गोल केला तर 31 व्या मिनिटाला संकेतच्या पासवर ओमकराने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 39 व्या मिनिटाला पॉलिटेक्निकच्या तन्मयने गोल करुन 1-2 ची आघाडी कमी केली. शेवटी हा सामना बीसीए संघाने जिंकला. सहाव्या सामन्यात वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक कॉलेजने मराठा मंडळ पॉलिटेक्निकचा सडन डेथमध्ये 6-5 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेत 31 व्या मिनिटाला मराठा मंडळच्या रोशनने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. तर 44 मिनिटाला कैफने गोल करुन 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर पंचांनी टायब्रेक नियमाचा वापर केला. त्यामध्ये दोन्ही संघांनी 4-4 अशी बरोबरी साधल्याने पंचांनी सडन डेथ नियमाचा वापर केला. त्यामध्ये वसंतराव पोतदार संघाने 7-6 अशा गोलफरकाने पराभव केला. वसंतराव पोतदारतर्फे प्रवीण, कामेश, कुशल, वरुण, कैफ, समर्थ व वेदांत यांनी गोल केले तर मराठा मंडळतर्फे रोशन, विकी, शाहू, युवराज, सुजल यांनी गोल केले.

Advertisement
Tags :

.