म्हैसूरप्रमाणे बेळगावातही खुल्या शववाहिका
आरोग्य स्थायी समिती बैठकीत ठराव : लवकरच होणार दाखल
बेळगाव : म्हैसूरमध्ये ज्याप्रमाणे आकर्षक व खुल्या शववाहिका आहेत, त्याचप्रमाणे बेळगाव शहरातील दक्षिण आणि उत्तर या दोन मतदारसंघासाठी स्वतंत्र दोन खुल्या शववाहिका सुरू केल्या जाणार आहेत. यासाठी नुकत्याच पार पडलेल्या आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत दोन खुल्या शववाहिन्या खरेदी करण्याचा ठराव करण्यात आला असून लवकरच म्हैसूरसारख्या शववाहिका बेळगावात सुरू होणार आहेत. बेळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवक यापूर्वी म्हैसूर अभ्यास दौऱ्यावर गेले होते. त्याठिकाणी म्हैसूर महानगरपालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करून माहिती घेण्यात आली होती.
बेळगावमध्ये सध्या कार्यरत असलेल्या शववाहिका बंदिस्त स्वरुपाच्या आहेत. शववाहिकांना पुष्पहार व सजावट करण्यासह लोकांना त्यामध्ये बसण्यास जागा उपलब्ध होत नाही. म्हैसूरमध्ये कार्यरत असलेल्या शववाहिका चोहोबाजूंनी खुल्या असून वरती टॉप आहे. तसेच चोहोबाजूंनी आकर्षक सजावट करून खुली जागा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना बसण्यासह मृतदेहदेखील पाहता येतो. त्यामुळे अशा प्रकारच्या दोन शववाहिका दक्षिण आणि उत्तर मतदारसंघासाठी सुरू केल्या जाणार आहेत. यासाठी आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच म्हैसूरसारख्या शववाहिका बेळगावातसुद्धा सुरू होणार आहेत.
उत्तर-दक्षिण मतदारसंघांसाठी स्वतंत्र शववाहिका
बेळगाव महानगरपालिकेच्यावतीने म्हैसूर अभ्यासदौरा करण्यात आला होता. त्यावेळी म्हैसूर महानगरपालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या खुल्या शववाहिकांप्रमाणेच बेळगावातही शववाहिका सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नुकत्याच पार पडलेल्या आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत उत्तर व दक्षिण मतदारसंघांसाठी दोन स्वतंत्र शववाहिका सुरू करण्याचा ठराव करण्यात आला आहे.
- श्रीशैल कांबळे, (अध्यक्ष- आरोग्य स्थायी समिती)